भारतीय कंपाऊंड तिरंदाजी संघ जागतिक दर्जाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:10 AM2018-08-07T04:10:03+5:302018-08-07T04:10:14+5:30
आशियाई स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या भारतीय कंपाऊंड तिरंदाजी संघासाठी १० दिवसांचे सराव शिबिर आयोजित करणारा इटलीचा स्टार तिरंदाज सर्गियो पाग्नी खेळाडूंच्या प्रगतीमुळे उत्साहित आहे.
कोलकाता : आशियाई स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या भारतीय कंपाऊंड तिरंदाजी संघासाठी १० दिवसांचे सराव शिबिर आयोजित करणारा इटलीचा स्टार तिरंदाज सर्गियो पाग्नी खेळाडूंच्या प्रगतीमुळे उत्साहित आहे. भारतीय संघ इंडोनेशियामध्ये पदक पटकावण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास सर्गियोने व्यक्त केला.
भारताने चार वर्षांपूर्वी इंचियोनमध्ये कंपाऊंड गटात चारही स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केली होती. त्यामुळे १८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत भारत या खेळात पदकाचा प्रबळ दावेदार आहे. विश्वकप फायनल (२०१० व २०११) सलग दोनदा जेतेपद पटकावणारा एकमेव कंपाऊंड तिरंदाज ३९ वर्षीय पाग्नी जानेवारीपासून भारतीय संघासोबत जुळला आहे. आता भारतीय संघ दोन आठवड्यांसाठी इटली दौºयावर गेलेला आहे.
पाग्नी म्हणाला,‘मला खेळाडूंच्या कामगिरीचा अभिमान आहे. ते सर्व जागतिक दर्जाचे आहेत. आशियाडमध्ये ते यशस्वी ठरतील, असा मला विश्वास आहे. त्यात अभिषेक वर्मा व रजत चौहाण यांच्यासारखे अनुभवी तिरंदाज आहेत, पण युवा खेळाडूही चांगली कामगिरी करीत आहेत.’ (वृत्तसंस्था)