भारतीय सायकलपटू आशियाई स्पर्धेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:09 AM2018-08-08T04:09:41+5:302018-08-08T04:09:55+5:30
पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सायकलपटू पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत.
नवी दिल्ली : पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय सायकलपटू पदकांचा प्रदीर्घ दुष्काळ संपविण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सायकलिंगची सुरुवात १९५१ मध्ये भारताच्या यजमानपदाखाली झाली होती. त्यात भारतीय खेळाडूंनी एक रौप्य व दोन कांस्य, अशा एकूण तीन पदकांची कमाई केली होती; परंतु त्यानंतर भारतीय संघ या स्पर्धेत कधीही पदक जिंकू शकला नाही.
भारतीय सायकलपटू नयना राजेश आणि ई. चाओबा देवी यांची या वेळेस तयारी चांगली असून, संघ पदकाचा दावेदार असेल, असे सांगितले. आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच खेळण्यास सज्ज असणाºया नयनाने म्हटले, ‘आमची तयारी चांगली आहे. मी वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेत सहभागी होत आहे; परंतु आमचे जास्त लक्ष चार खेळाडूंच्या सांघिक स्पर्धेवर आहे. त्यात आम्ही चांगली कामगिरी करीत आहोत.’ गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारी चाओबा म्हणाली, ‘मी या स्पर्धेत दुसºयांदा जात आहे; परंतु मला आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा जास्त अनुभव नाही. याआधी मी २0१४ आशियाई आणि २0१६ मध्ये गुवाहाटीत झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सहभाग घेतला होता. आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू. यावेळी पदकांची प्रतीक्षा संपेल, अशी आशा आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून महासंघाने आम्हाला चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत.’
भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव ओंकार सिंग म्हणाले, ‘आशियाई स्पर्धेत आमचे १५ खेळाडू सहभागी होत आहेत. स्प्रिटिंग संघ गेल्या तीन महिन्यांपासून जर्मनीत तयारी करीत आहे. वैयक्तिक स्पर्धेतील खेळाडू दिल्लीत तयारी करीत आहेत. पदकांच्या शक्यतेविषयी मी जास्त काही सांगू शकत नाही. आमचा प्रवास तीन वर्षांआधीपासून सुरू झाला आणि पदकापर्यंत पोहोचण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी हवा.’