भारतीय फुटबॉलने आता मागे वळून पाहू नये : छेत्री
By admin | Published: November 5, 2016 05:41 AM2016-11-05T05:41:04+5:302016-11-05T05:41:04+5:30
एएफसी चषकमध्ये बंगळुरू एफसीला अंतिम सामन्यात घेऊन जाणारा आघाडीचा स्ट्रायकर सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉल संघाने आता मागे वळून पाहू नये,
नवी दिल्ली : एएफसी चषकमध्ये बंगळुरू एफसीला अंतिम सामन्यात घेऊन जाणारा आघाडीचा स्ट्रायकर सुनील छेत्रीने भारतीय फुटबॉल संघाने आता मागे वळून पाहू नये, असे सांगत अजून एक इतिहास रचण्यासाठी देशवासीयांनी भारतीय फुटबॉल क्लबला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
बंगळुरू एफसी हा या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचणारा पहिला भारतीय क्लब आहे. या क्लबने विद्यमान चॅम्पियन दारूल ताजिमचा गेल्या महिन्यात ४-२ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. इराकच्या एअरफोर्स क्लबबरोबर बंगळुरू एफसीचा आज, शनिवारी अंतिम सामना होणार आहे.
‘पीटीआय’शी बोलताना छेत्रीने सांगितले की, फुटबॉलचा हा अंतिम सामना माझ्या क्लबच्या करिअरसाठी सर्वांत महत्त्वपूर्ण सामना आहे. क्लब आणि देशाने या खेळातून आशियाई फुटबॉल संघटनेचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहू नये.
अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली भारतीय टीम बनण्याचा इतिहास आम्ही रचला आहे, असे सांगत या ३२ वर्षीय स्ट्रायकरने टीमला पाठिंबा देण्याचे आवाहन देशवासीयांना केले. संपूर्ण देश अंतिम सामन्यात आमच्या पाठीशी आहे, हे पाहणे आमच्यासाठी आनंदाचे राहील, असे तो म्हणाला.