मैत्री सामन्यासाठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा
By Admin | Published: August 26, 2016 03:39 AM2016-08-26T03:39:11+5:302016-08-26T03:39:11+5:30
३ सप्टेंबर रोजी पुअर्तो रिको संघाविरुद्ध मुंबईत खेळण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसाठी भारताचा २८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला
नवी दिल्ली : ३ सप्टेंबर रोजी पुअर्तो रिको संघाविरुद्ध मुंबईत खेळण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांसाठी भारताचा २८ सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. १९९५ नंतर मुंबईत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना रंगणार आहे.
पुअर्तो रिको संघ फिफा मानांकनात ११४ व्या, तर भारतीय संघ १५२ व्या स्थानावर आहे. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने या सामन्याचे आयोजन करण्यात आले असून, मुंबईतील अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्ये सामने खेळविले जाणार आहेत.
येत्या महिन्यात म्हणजेच ३, ५ सप्टेंबरला या सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी लागणारी तयारी पूर्णत्वास येत आहे, असे महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या आंतरराष्ट्रीय फुटबॉल मेगा इव्हेंटची योजना मुंबई महानगरपालिकेसह मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनने आयोजित केली असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये फिफा या आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे प्रतिनिधी अंधेरी स्पोर्ट कॉम्प्लेक्सचे निरीक्षण करून गेले होते. त्यानंतर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत बोलताना भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉईन्स्टाईन यांनी सांगितले की, या सामन्यांसाठी २८ जणांची निवड करण्यात आली आहे. ते सर्व खेळाडू २८ आॅगस्टला शिबिरासाठी उपस्थित राहतील. (वृत्तसंस्था)
>निवडण्यात आलेले
संभाव्य खेळाडू !
गोलकिपर : सुब्रतो पॉल, गुरुप्रीतसिंग संधू, अमरिंदर सिंग. डिफेंडर : रिनो एंटो, संदेश झिंगन, अर्णव मंडल, कीगन परेरा, चिंगलेनसाना सिंह, प्रीतम कोटल, नारायण दास, फुलगांको कार्डोजा.
मिडफिल्डर : विनीत राय, युचेनेसन लिंग्दोह, धनपाल गणेश, प्रणय हलदर, जॅकिचंद सिंग, आयझॅक वनमालसावमा, विकास जैरू, उदांता सिंह, हलीचरण नर्जरी, राउलीन बोर्जेस, एलविन जॉर्ज, जर्मनप्रीत सिंग, मोहम्मद रफिक अर्जुन टुडू.
फॉरवर्ड : छेत्री, जेजे लालपेखलुआ, सुमित पास्सी.