भारतीय फुटबॉल संघाने रचला इतिहास; केला भारतीयांना अभिमान वाटेल 'असा' पराक्रम!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 02:12 PM2022-06-14T14:12:51+5:302022-06-14T14:13:33+5:30
भारतीय कर्णधार सुनील छेत्री मेस्सीला मागे टाकण्याच्या अगदी जवळ
Indian Football Team Creates History | भारतीयफुटबॉल संघ सलग दुसऱ्यांदा एएफसी आशियाई चषक (AFC Asia Cup) स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. फिलीपिन्सविरुद्ध पॅलेस्टाईनने ४-० असा विजय मिळवल्यानंतर भारताने हा पराक्रम केला. आता मंगळवारी (१४ जून) होणाऱ्या पुढील सामन्यात भारत हाँगकाँगकडून हरला, तरीही भारताच्या क्वालिफिकेशनवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. भारतीय संघाने एकूण पाचव्यांदा या स्पर्धेत प्रवेश केला आहे. तसेच, भारतीय संघ सलग दोन वेळा या स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा पराक्रम संघाने करून दाखवला आहे. याआधी, १९६४ मध्ये भारताने पहिल्यांदा या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर १९८४, २०११ आणि २०१९ च्या स्पर्धाही भारताने खेळल्या होत्या.
🥳 HERE WE COME 🥳
— Indian Football Team (@IndianFootball) June 14, 2022
As Palestine 🇵🇸 defeat Philippines 🇵🇭 in Group 🅱️, the #BlueTigers 🐯 🇮🇳 have now secured back-to-back qualifications for the @afcasiancup 🤩#ACQ2023 🏆 #BackTheBlue 💙 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/3aNjymWLSm
एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताने कंबोडिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला होता. भारताने कंबोडियाविरुद्ध २-० असा विजय मिळवला होता, तर अफगाणिस्तानला सुनील छेत्रीच्या संघाने २-१ ने धूळ चारली होती. सुनील छेत्रीने कंबोडियाविरुद्ध दोन्ही गोल केले होते. तर अफगाणिस्तानविरुद्ध छेत्री आणि सहल अब्दुल समद यांनी गोल करण्यात यश मिळवले होते. भारताचा पुढील सामना आज हाँगकाँगशी आहे.
🚨 IT'S D-DAY 🚨
— Indian Football Team (@IndianFootball) June 14, 2022
🇮🇳 play 🇭🇰 in the last game of the #ACQ2023 🏆 final round, at the VYBK today 🤩
⏳ 8.30 PM IST 🕣
📍 VYBK 🏟️
📺 @StarSportsIndia, @DisneyPlusHS, @OfficialJioTV#INDHKG ⚔️ #BackTheBlue 💙 #BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/pEwaGijiwj
अफगाणिस्तानविरुद्ध गोल केल्यानंतर भारतीय कर्णधार सुनील छेत्रीने १२८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८३ गोल केले आहेत. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) हे सुनील छेत्रीच्या पुढे आहेत. रोनाल्डोने १८९ सामन्यांमध्ये ११७ गोल केले आहेत. तर मेस्सीने १६२ सामन्यांमध्ये ८६ गोल केले आहेत. भारताचा पुढील सामना हाँगकाँग विरुद्ध असणार आहे. त्यात सुनील छेत्रीची नजर मेस्सीला मागे टाकण्यावर असणार आहे.