भारतीय फुटबॉल संघाचा मुंबईत सराव
By admin | Published: March 14, 2017 12:42 AM2017-03-14T00:42:44+5:302017-03-14T00:42:44+5:30
आंतरराष्ट्रीय मैत्री सामना आणि एएफसी आशिया कप पात्रता फेरीतील आपल्या पहिल्या सामन्याआधी भारताच्या राष्ट्रीय संघाने सोमवारी पहिल्या सराव सत्रात
मुंबई : आंतरराष्ट्रीय मैत्री सामना आणि एएफसी आशिया कप पात्रता फेरीतील आपल्या पहिल्या सामन्याआधी भारताच्या राष्ट्रीय संघाने सोमवारी पहिल्या सराव सत्रात घाम गाळला. मुंबईतील शहाजी राजे क्रीडासंकुल स्टेडियममध्ये भारतीय संघाचे सराव शिबिर सुरू आहे.
अंधेरी येथील स्टेडियममध्ये मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंचा सराव सुरू आहे. सराव सत्रानंतर कॉन्स्टेनर्टान म्हणाले, की जेव्हा राष्ट्रीय संघासोबत सराव करण्याची संधी मिळते, तो क्षण माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ क्षण असतो. हीच गोष्ट मी सर्वोत्तमरीत्या करू शकतो. माझ्या मते, गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही देशाला गौरवान्वित करण्याची कामगिरी केली आहे.
आपल्या पुढील लक्ष्याविषयी कॉन्स्टेनटाईन म्हणाले, की आम्हाला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. मात्र, २०१९मध्ये यूएईला होणाऱ्या एएफसी आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरणे आमचे सध्या मुख्य लक्ष्य आहे.
दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरासाठी १५ खेळाडू आले असून, आयलीग क्लब मोहन बागान आणि बंगळुरू एफसीसाठी खेळणारे काही मुख्य खेळाडू एएफसी कप सामन्यानंतर बुधवारी या शिबिरामध्ये सहभागी होतील. (क्रीडा प्रतिनिधी)