पॅरा आशियाई स्पर्धेत भारताचा ‘गोल्डन फ्रायडे’; एकाच दिवशी पाच सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 05:02 AM2018-10-13T05:02:11+5:302018-10-13T05:02:55+5:30
येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली.
जकार्ता : येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. रिओ आॅलिम्पिकची पदक विजेती दीपा मलिक हिने स्पर्धेत दुसरे कांस्य जिंकले. भारताला स्पर्धेत आतापर्यंत ६३ पदके मिळाली असून त्यात १३ सुवर्ण, २० रौप्य व ३० कांस्य पदकांचा समावेश आहे.
के. जेनिटा अॅन्टो हिने रॅपिड पी/१ बुद्धिबळाच्या फायनलमध्ये इंडोनेशियाची मनुरुनग रोसलिडा हिला १-० ने नमविले तर पुरुषांमध्ये किशन गंगोली याने माजिद बाधेरीचा बी२/बी३ प्रकारात पराभव करीत सुवर्णावर नाव कोरले. रॅपिड पी१ हा प्रकार शारीरिक दिव्यांगात तर बी/२,बी/३ हा प्रकार नेत्रहीनतेशी संबंधित आहे. बॅडमिंटनमध्ये पारुल परमारने थायलंडची वांडी खमतम हिचा २१-९,२१-५ असा पराभव करीत महिला एकेरीत एसएल/३ प्रकारात सुवर्ण जिंकले. या प्रकारात एका किंवा दोन्ही पायांनी चालताना त्रास होणारे खेळाडू संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात.
चौथे सुवर्ण पुरुषांच्या भालाफेकीत एफ५५ प्रकारात नीरज यादवने जिनकून दिले. अमित बलियानला रौप्यावर समाधान मानावे लागले. नीरजने २९.२४ मीटर भालाफेक केली. पुरुषांच्या क्लब थ्रोमध्ये अमित कुमार याने सुवर्ण तसेच धरमवीरने रौप्य जिनकले. अमितने २९.४७ मीटरसह स्पर्धेत नवा विक्रम नोंदविला.
जलतरणात स्वप्निल पाटील याने एस/१० प्रकारात पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. याआधी त्याने
४०० मीटर फ्री स्टाईलचे कांस्य जिंकले होते. पुरुषांच्या सी/४ चार हजार मीटर सायकलिंगमध्ये गुरलालसिंग याने कांस्य पदकाची कमाई केली. (वृत्तसंस्था)
दीपाला थाळीफेकीत कांस्य
पॅरालिम्पिक पदक विजेती थाळीफेकपटू दीपा मलिकने आशियाई पॅरालिम्पिकमध्ये शुक्रवारी महिलांच्या एफ ५१/५२/५३ प्रकारात कांस्य जिंकले. दीपाने चौथ्या प्रयत्नांत ९.६७ मीटर थाळीफेक केली. इराणची इलनाज दरबियान १०.७१ मीटरच्या नव्या आशियाई विक्रमासह सुवर्ण विजेती ठरली. बहरीनची फातिमा नेदामला ९.८७ मीटरसह रौप्य पदक मिळाले. अन्य एक भारतीय खेळाडू एकता भयान हिला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. एफ ५१/५२/५३ प्रकार हातात ताकद तसेच वेग असणे पण पोटाच्या खालचा भाग विकलांग असण्याशी संबंधित आहे.