भारतीय हॉकी संघाला मिळालेली संधी साधावी लागेल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:44 AM2019-11-04T06:44:51+5:302019-11-04T06:45:16+5:30
प्रशिक्षक ग्राहम रीड यांचे वक्तव्य
भुवनेश्वर : ‘टोकियो आॅलिम्पिकमध्ये पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्ट्रायकर्सने मिळालेल्या संधीचा लाभ घेत बचाव फळीला चांगली कामगिरी करावी लागेल,’ अशी प्रतिक्रिया भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्राहम रीड यांनी व्यक्त केली. आॅस्ट्रेलियाचे रीड १९९२ बार्सिलोना आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या संघाचे खेळाडू होते. त्यांच्या प्रशिक्षकपदासाठी आॅस्ट्रेलिया संघाला २०१६ रिओ आॅलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नव्हती. रीड भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास प्रयत्नशील आहे.
शनिवारी सामन्यानंतर बोलताना ते म्हणाले, ‘माझे स्वप्न पूर्ण झालेले नाही. तुम्ही नेहमी आॅलिम्पिकमध्ये अव्वल स्थान पटकावण्याचे स्वप्न बघता. खेळाडू म्हणून पदक जिंकता आल्यामुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो. अशा आठवणी सदैव तुमच्यासोबत असतात.’
आॅलिम्पिकमध्ये विक्रमी आठवेळा सुवर्णपदकाचा मान मिळवणाºया भारतीय हॉकी संघाने दोन टप्प्यांच्या एफआयएच पुरुष पात्रता फेरीच्या दुसºया लढतीत शनिवारी रशियाचा ७-१ (दोन सामन्यांत एकूण ११-३) असा दमदार पराभव केला. या शानदार विजयासह भारतीय हॉकी पुरुष संघाने पुढील वर्षी टोकियोमध्ये होणाºया आॅलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.
भारतीय प्रशिक्षक म्हणाले, ‘आम्हाला या संघाकडून अशीच कामगिरी अपेक्षित आहे. यामुळे आॅलिम्पिक मोहिमेला मोठी मदत होईल. मी खेळाडूंना सांगितले की, तुमच्याकडे अद्याप (आॅलिम्पिकपूर्वी) नऊ महिन्यांचा कालावधी आहे. आपल्याला आपल्या खेळामध्ये सातत्याने सुधारणा करावी लागले. ही आमची योजना आहे. आमचे लक्ष प्रक्रियेवर असून निकाल आपोआप मिळतील.’ (वृत्तसंस्था)
‘बचावफळी मजबूत करण्याची गरज’
आगामी कालावधीत खेळाडू आपल्या कामगिरीत सुधारणा करतील असा विश्वास व्यक्त करताना रीड म्हणाले,‘आम्हाला संधीचे गोलमध्ये रुपांतर करण्यामध्ये सुधारणा करावी लागेल. आम्ही अनेक संधी निर्माण करतो, ही चांगली बाब आहे. पण, या संधींचे गोलमध्ये रुपांतर करावे लागेल. संघाची बचावफळीही मजबूत करण्याची गरज आहे. कारण प्रतिस्पर्धी संघाला वर्चस्व गाजवण्याच्या अधिक संधी देत आहोत.’