भारतीय मल्लांची सुवर्णमोहीम आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 03:33 AM2018-04-12T03:33:31+5:302018-04-12T03:33:31+5:30
अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कुस्ती प्रकारात आज गुरुवारपासून सुवर्णपदक जिंकण्याची दावेदारी सादर करणार आहे.
गोल्ड कोस्ट : अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कुस्ती प्रकारात आज गुरुवारपासून सुवर्णपदक जिंकण्याची दावेदारी सादर करणार आहे. सुरुवातीला दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार (७४ किलो) दमखम दाखविणार आहे. भारोत्तोलन स्पर्धा पार पाडल्यानंतर त्याच ठिकाणी कुस्ती स्पर्धेसाठी आखाडा तयार करण्यात आला आहे. २३ देशांचे १०३ मल्ल पुढील तीन दिवस पदकासाठी चढाओढ करणार आहेत. भारतीय भारोत्तोलकांनी पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदके जिंकल्यानंतर मल्लांकडून यापेक्षा वरचढ कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. भारतीय कोच कुलदीप म्हणाले, ‘आमच्या मल्लांनी सुवर्ण जिंकावे, अशी प्रत्येकाने आशा बाळगली आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की असेच घडेल. उत्कृष्ट फिटनेस असलेला सुशील कुमार सलामीला खेळणार आहे.’ या स्पर्धेआधी सुशीलची तयारी फारशी चांगली झालेली नाही. सुशीलशिवाय पुरुष गटात राहुल आवारे पहिल्याच दिवशी खेळणार आहे. ५७ किलो फ्री स्टाइल प्रकारात राहुल राष्टÑकुलचा सुवर्णविजेता आहे.
२०१४ च्या ग्लास्गो राष्टÑकुल स्पर्धेत भारताने कुस्तीत पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्यसह एकूण १३ पदके जिंकली होती. अव्वल स्थानावर असलेल्या कॅनडाच्या तुलनेत त्या वेळी एक पदक कमी होते.
कुलदीपसिंग म्हणाले, ‘ग्लास्गोपेक्षा अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सर्वोत्कृष्ट कामगिरी हे आमचे लक्ष्य असून महिला गटात नायजेरिया आणि कॅनडा यांच्याकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.’
महिला गटाच्या ५३ किलोमध्ये बबिता फोगट आज खेळणार असून, तिच्या काकाची मुलगी आणि सध्याची चॅम्पियन विनेश फोगट ही ४८ किलोमध्ये अखेरच्या दिवशी आव्हान सादर करणार आहे. आॅलिम्पिक कांस्यविजेती साक्षी मलिक (६२ किलो) हिची लढत अखेरच्याच दिवशी होईल. (वृत्तसंस्था)
>राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून श्रेयसीचे अभिनंदन
पाटणा : राष्टÑकुल स्पर्धेच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णविजेती महिला नेमबाज श्रेयसी सिंग हिचे बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अभिनंदन केले. बिहारच्या मुलीने सुवर्ण जिंकून राज्याचे व देशाचे नाव जगभरात उंचावल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. नितीश कुमार यांनी श्रेयसीची पाठ थोपटली आणि पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
>महिला हॉकीत आॅस्ट्रेलियाचे भारताला आव्हान
गोल्ड कोस्ट : भारतीय महिला हॉकी संघाने राष्टÑकुलमध्ये शानदार पुनरागमन करीत आत्मविश्वास परत मिळविला. तथापि, उपांत्य फेरीत यजमान आॅस्ट्रेलियाचा अडथळा कसा दूर करायचा, हे मोठे आव्हान संघापुढे आहे.