भारतीय पुरुष उपांत्य फेरीत
By admin | Published: February 20, 2016 02:41 AM2016-02-20T02:41:03+5:302016-02-20T02:41:03+5:30
भारतीय पुरुष संघाने बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी कायम राखताना शुक्रवारी माजी चॅम्पियन मलेशियाचा ३-२ ने पराभव करीत उपांत्य फेरीत धडक
हैदराबाद : भारतीय पुरुष संघाने बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरी कायम राखताना शुक्रवारी माजी चॅम्पियन मलेशियाचा ३-२ ने पराभव करीत उपांत्य फेरीत धडक मारली.पुरुष संघ थॉमस कप स्पर्धेसाठी पात्र ठरला. थॉमस कप स्पर्धेचे आयोजन यंदा मे महिन्यात करण्यात आलेले आहे. कोरियाविरुद्ध ३-० ने पराभव स्वीकारणाऱ्या महिला संघाचे आव्हान संपुष्टात आले.
या लढतीच्या निमित्ताने उभय संघांदरम्यान चुरस अनुभवायला मिळाली. ही लढत एकवेळ २-२ अशी बरोबरीत होती. त्यानंतर एच.एस. प्रणयने पाच सामन्यांच्या लढतीतील निर्णायक लढतीत सरशी साधत गचीबाऊली स्टेडियममध्ये भारताला उपांत्य फेरी गाठून दिली.
प्रणयने एकेरीच्या अखेरच्या लढतीत टेक झी सूचा २१-१२, २२-२० ने पराभव करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
जागतिक क्रमवारीत २७ व्या स्थानावर असलेल्या प्रणयने पहिला गेम सहज जिंकला मात्र त्यानंतर त्याच्यापेक्षा खालचे मानांकन असलेल्या मलेशियन खेळाडूने दुसऱ्या गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ करीत भारतीय खेळाडूला घाम गाळण्यास भाग पाडले. त्याआधी, साखळी फेरीत अपराजित असलेला भारतीय कर्णधार किदांबी श्रीकांतने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आणि एकेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाच्या जुल्किफलीचा २१-१२, २२-२० ने पराभव करीत भारताला चांगली सुरुवात करून दिली. मन्नू अत्री व सुमित रेड्डी या दुहेरीच्या जोडीने जुआन शेन लाऊ व कियांग मेंग टेन जोडीचा १०-२१, २२-२०, २१-१६ ने पराभव केला आणि भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.
भारताला त्यानंतर मात्र धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर असलेल्या अजय जयराम याला क्रमवारीत ३९ व्या स्थानावर असलेल्या इसकंदर जुल्करनैन जैनुद्दीनविरुद्ध पहिला गेम जिंकल्यानंतरही २१-१७, १२-२१, १६-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. दुहेरीच्या दुसऱ्या लढतीत प्रणव जैरी चोपडा व अक्षय देवाळकर या जोडीला यू सिन ओंग व आई यी तियोई या जोडीविरुद्ध १४-२१, २१-१४, १२-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह मलेशियाने २-२ अशी बरोबरी साधली.
प्रणयने निर्णायक लढतीत विजय मिळवत भारताला उपांत्य फेरी गाठून दिली. पाच सामन्यांच्या या लढतीत एकेरीच्या तीन व दुहेरीच्या दोन लढतींचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)