भारतीय आॅलिम्पिकपटू डोपमुक्त : नाडा
By admin | Published: July 14, 2016 03:00 AM2016-07-14T03:00:00+5:302016-07-14T03:00:00+5:30
रिओ आॅलिम्पिकला जाणारे सर्वच भारतीय खेळाडू डोपमुक्त असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय डोपिंगविरोधी (नाडा) एजन्सीने बुधवारी दिले.
नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकला जाणारे सर्वच भारतीय खेळाडू डोपमुक्त असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रीय डोपिंगविरोधी (नाडा) एजन्सीने बुधवारी दिले.
नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या सर्वच खेळाडूंची प्रतिबंधित औषध सेवन चाचणी पार पडली. त्यात सर्व जण डोपमुक्त आढळून आले. वाडाच्या निकषानुसार सर्वच खेळाडूंची डोपिंग चाचणी होणे अनिवार्य आहे. त्यानुसार खेळाडूंसाठी मोहीम राबविण्यात आली. काही खेळाडू निर्धारित वेळेत उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांचीही नंतर चाचणी पार पडली.
अग्रवाल हे मागच्या महिन्यात नाडाचे महासंचालक बनले. ते पुढे म्हणाले, ‘‘रिओला जाणाऱ्या सर्व खेळाडूंची डोप चाचणी पार पडली. काहींची एक वेळा, काहींची दोन वेळा आणि काहींची तीन वेळा चाचणी पार पडली. काही खेळाडू विदेशात सराव करीत असल्याने किमान एकदा तरी त्यांची चाचणी घेण्यात आली. या खेळाडूंसाठी आम्ही विदेशात एजन्सीमार्फत चाचणी घेतली. रिओला जाणाऱ्या भारतीय पथकाकडून यंदा कुठल्याही प्रकारचे डोपिंग उल्लंघन होणार नाही, याची मला खात्री आहे. खेळाडूंबाबत आमचे धोरण कठोर आहे. खेळात कुठलेही गैरप्रकार चालणार नाहीत, अशी कडक ताकीदही देण्यात आली आहे.’’
काही खेळाडूंनी डोपिंग चाचणीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला का, असे विचारताच अग्रवाल म्हणाले, ‘‘काहीअशी प्रकरणे होती, पण खेळाडूंनी आपले स्थळ सांगितल्याने पुढील गैरसोय टळली. सर्व खेळाडूंनी दुसऱ्याच प्रयत्नात आपापले स्थळ सांगितल्याने यंदा डोपिंगचे कुठलेही उल्लंघन झालेले नाही.’’ (वृत्तसंस्था)