भारतीय खेळाडू टोकियोला पोहोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 08:45 AM2021-07-19T08:45:29+5:302021-07-19T08:45:57+5:30
कोरोना महामारीदरम्यान होत असलेल्या या स्पर्धेसाठी भारताच्या ८ खेळांचे संघ विशेष विमानाने टोकियोला उतरले.
टोकियो : आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याचा निर्धार केलेल्या भारतीय खेळाडूंचा पहिला संघ रविवारी सकाळी टोकियोत पोहोचला. कोरोना महामारीदरम्यान होत असलेल्या या स्पर्धेसाठी भारताच्या ८ खेळांचे संघ विशेष विमानाने टोकियोला उतरले. यामध्ये तिरंदाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, ज्यूदो, जिम्नॅस्टिक, जलतरण आणि भारोत्तोलन या खेळांचे खेळाडू, सहयोगी स्टाफ आणि अधिकारी यांचा समावेश आहे.
टोकियोमध्ये पोहोचलेल्या भारताच्या ८८ सदस्यांच्या पहिल्या संघात ५४ खेळाडूंसह सहयोगी स्टाफ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) प्रतिनिधी यांचा समावेश आहे. विमानतळावर कुरोबे शहराच्या प्रतिनिधींनी भारतीय संघाचे दणक्यात स्वागत केले. ‘कुरोबे शहर भारतीय संघाचे स्वागत करत आहे. चिअर्स फॉर इंडिया,’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन यजमानांनी भारतीयांचे स्वागत केले. याआधी, शनिवारी रात्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी इंदिरा गांधी विमानतळावर भारतीय संघाला जल्लोषात ऑलिम्पिक स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
सावध राहावे लागेल; ऑस्ट्रेलियन प्रमुखाची चिंता
- ऑलिम्पिक क्रीडागावामध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने आता अधिक सतर्क राहावे लागेल, असे मत ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक संघाचे प्रमुख इयान चेस्टरमॅन यांनी व्यक्त केले.
- ऑस्ट्रेलियाने ऑलिम्पिकसाठी ४८७ खेळाडूंचा संघ पाठविला आहे. आतापर्यंतचा ऑस्ट्रेलियाचा हा सर्वांत मोठा संघ आहे. ऑस्ट्रेलियाच्या २०० खेळाडूंचा पहिला संघ शनिवारी टोकियो येथे पोहोचला. चेस्टरमॅन यांनी सांगितले की, ‘क्रीडागावात कोरोनाचे संक्रमण होण्याची असलेली शक्यता आम्ही आधीपासूनच गृहीत धरली होती. त्यामुळेच क्रीडागावातील आमच्या योजना तयार आहेत.
- आयओसीच्या निर्देशांवरही आमचा विश्वास आहे. अद्याप संक्रमित व्यक्तींची ओळख पटली नसून, त्यांच्या संपर्कातील लोकांचीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे आता अधिक सतर्कता बाळगावी लागेल.