भारतीय खेळाडूंनी केली निराशा
By admin | Published: August 29, 2015 12:55 AM2015-08-29T00:55:25+5:302015-08-29T00:55:25+5:30
जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या २० किमी अंतराच्या चालण्याच्या शर्यतीमध्ये लियू होंग हिने महिलांच्या गटात बाजी मारताना चीनला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.
बीजिंग : जागतिक अॅथलेटीक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या २० किमी अंतराच्या चालण्याच्या शर्यतीमध्ये लियू होंग हिने महिलांच्या गटात बाजी मारताना चीनला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले. शुक्रवारी चालण्याच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत खुशबीर कौर ३७व्या स्थानावर राहिली. तर नियम मोडल्याने सपना अपात्र ठरली.
महिलांच्या २० किमी चालण्याच्या शर्यतीमध्ये यजमान चीनचे एकहाती वर्चस्व राहिले. सुवर्ण व रौप्य पदकावर कब्जा करताना चीनी खेळाडूंनी या स्पर्धेवर दबदबा राखला. लियूने १ तास २७ मिनिटे ४५ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्ण पटकावले. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या चीनच्याच लू शिऊझीने देखील हीच वेळ नोंदवत शर्यत पुर्ण केली. मात्र काही शतांशने मागे राहिलेल्याने तीला रौप्य पदाकावर समाधान मानावे लागले. तर युक्रेनच्या ओलियान्नोवस्का ल्युडमायला हिने १ तास २८ मिनिटे १ सेकंदाची वेळ देत कांस्य पदक कमावले. दरम्यान २२ वर्षीय अमृतसरच्या खुशबीरने याआधीच रिओ आॅलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. तीने गतवर्षी झालेल्या इंचिओन आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.
डेकॅथलॉनमध्ये जागतिक विक्रमवीर इटोनने १०० मीटरमध्ये १०.२३ सेकंद तर लांब उडीमध्ये ७.८८ मीटरची झेप घेऊन आघाडी घेतली. विशेष म्हणजे कॅनडाचे प्रतिनिधित्व करणारी इटोनची पत्नी थेईसेन इटोनने महिलांच्या हेप्टाथलॉनमध्ये रौप्य पदकाची कमाई केली. (वृत्तसंस्था)
सपना ठरली अपात्र...
महिलांच्या २० किमी चालण्याच्या स्पर्धेत भारताची अन्य अॅथलिट सपना हिने नियम मोडल्याने ती संपुर्ण शर्यतीमध्ये पहिल्या टप्प्यानंतर अपात्र ठरली. पहिले ५ किमीचे अंतर २४ मिनिट ५ सेकंदामध्ये पार केल्यानंतर ती अपात्र ठरली.