पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडूंचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2016 04:19 AM2016-09-08T04:19:38+5:302016-09-08T04:19:38+5:30
भारतीय पॅरालिम्पिक पथकाच्या किटचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे रिओत आज सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडू सहभागी होतील.
नवी दिल्ली : भारतीय पॅरालिम्पिक पथकाच्या किटचा प्रश्न निकाली निघाल्यामुळे रिओत आज सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय खेळाडू सहभागी होतील. क्रीडा मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या अधिकृत ब्लेझरवरील भारतीय तिरंग्यात पांढरा रंगच नव्हता. मागच्या बाजूला देशाचे नावदेखील लिहिलेले नव्हते. आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने (आयपीसी) यावर तीव्र आक्षेप नोंदविला. भारतीय खेळाडूंची किट अनधिकृत ठरविताच खेळाडूंच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण देत सांगितले, की रिओतील भारतीय पथकप्रमुखांकडून आम्ही माहिती घेतली आहे. मोठ्या स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे पोशाख आणि किट्सचे निरीक्षण होणे साधारण बाब आहे. २०१६ च्या पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंच्या संपूर्ण पोशाखाचे निरीक्षण झाले. आयपीसीने भारतासह अनेक देशांच्या पोशाखात काही बदल सुचविले. भारतीय खेळाडूंच्या समारंभातील किट्सवर जो आक्षेप घेण्यात आला तो मुद्दा निकाली काढण्यात आला आहे. आवश्यक सुधारणा केल्यानंतर आयपीसीने सुधारित किट्सला मंजुरी प्रदान केली. भारतीय पथक संपूर्ण उत्साहात उशिरा रात्री होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताचे यंदा सर्वाधिक १९ खेळाडू सहभागी होणार आहेत. (वृत्तसंस्था)
नवी दिल्ली : रिओ पॅरालिम्पिकचे भारतात थेट प्रक्षेपण करण्याची मागणी पॅराअॅथलिटच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या पॅरास्पोर्ट्स फाउंडेशनने केली आहे. फाउंडेशनचे महासचिव प्रदीप राज यांनी बुधवारी पत्रकारांपुढे कैफियत मांडताना अन्य खेळांसारखेच देशात पॅरालिम्पिकचे थेट प्रसारण व्हावे, अशी मागणी केली. भारतीय पॅरालिम्पिक समितीने मंगळवारी भारतात पॅरालिम्पिकचे थेट प्रक्षेपण होणार नसल्याचे म्हटले होते. भारताने या स्पर्धेत १९ खेळाडूंचे पथक पाठविले आहे.
पॅराअॅथलिट्ससोबत हा भेदभाव असल्याची भावना फाउंडेशनने व्यक्त केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिव्यांगांसाठी काही करण्याची योजना असल्याचे मन की बातमध्ये सांगतात, तर दुसरीकडे दिव्यांगांच्या मनातली गोष्ट ओळखत नाही, असा टोलादेखील राज यांनी हाणला.
रिओ पॅरालिम्पिकचे प्रसारण हक्क यंदा कुठल्याही खासगी चॅनलने खरेदी केले नाहीत. प्रसारण किंमत मात्र लंडन पॅरालिम्पिकच्या तुलनेत कमी होती हे विशेष. इराणसारख्या लहान देशात पॅरालिम्पिकचे प्रक्षेपण होते; पण भारतात नाही, हे खेदजनक असल्याचे राज यांचे मत होते.
क्रीडा मंत्रालयदेखील प्रक्षेपणाकडे दुर्लक्ष करीत पॅरालिम्पिकपटूंची उपेक्षा करीत असल्याचे सांगून राज पुढे म्हणाले, ‘प्रक्षेपणाच्या मागणीवरून आम्ही विविध मंत्रालयांना तीन पत्रे लिहिली; पण लाभ झाला नाही. सरकार किंवा पीसीआयने आमची मागणी न मानल्यास आम्ही न्यायालयाचे दार ठोठावू.’ प्रदीप यांनी साई आणि पीसीआयच्या काही अधिकाऱ्यांकडे अंगुलिनिर्देश करीत, काहींनी प्रक्षेपण न होण्यासाठी नाक खुपसत असल्याचा आरोप केला
सीरिया, इराणच्या शरणार्थींवर नजरा
रिओ दी जेनेरिओ : सीरियामध्ये सुरू असलेल्या यादवी युद्धामध्ये आपला उजवा पाय गमावलेला इब्राहिम अल हुसैनचा बुधवारपासून ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत दोन सदस्यीय शरणार्थी संघामध्ये समावेश आहे. या जागतिक मंचावरून जगाला आपल्या देशातील समस्यांबाबत माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे, आपल्या देशात सुरू असलेल्या यादवी युद्धामध्ये पाय गमावून अपंगत्व आल्यानंतरही जगातील सर्वोत्कृष्ट पॅराअॅथलिटसोबत खेळण्याची हुसैनला मोठी संधी मिळाली आहे.