दूतावासातून उपाशीपोटी परतले भारतीय खेळाडू
By admin | Published: August 17, 2016 03:58 AM2016-08-17T03:58:00+5:302016-08-17T03:58:00+5:30
सलग अपयशामुळे हताश आणि निराश झालेल्या भारतीय आॅलिम्पिक पथकातील काही खेळाडू भारतीय दूतावासात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले.
रिओ : सलग अपयशामुळे हताश आणि निराश झालेल्या भारतीय आॅलिम्पिक पथकातील काही खेळाडू भारतीय दूतावासात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले. या कार्यक्रमानंतर त्यांची केवळ भुईमूगाच्या शेंगा खायला घालून बोळवण करण्यात आली.
हॉकी संघातील एक सदस्य नाराज होता. नाराजीच्या सूरातच तो म्हणाला,‘आम्हाला खायला केवळ भुईमूगाच्या शेंगा मिळाल्या. आम्हाला रात्रीचे भोजन दिले जाईल, अशी अपेक्षा होती, पण बीअर, सॉफ्ट ड्रिंक आणि भुईमूगाच्या शेंगा दिल्याने घोर निराशा झाली.
आम्ही क्रीडाग्राममध्येही रात्रीचे जेवण न घेण्याचा निर्णय आधीच केल्यामुळे आम्हाला उपाशीपोटी परत यावे लागले. यामुळे फारच वाईट वाटले.’ब्राझीलच्या भारतीय दूतावासाने आयोजित केलेला हा ७० वा स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा कार्यक्रम फार मोठा नव्हता. स्पर्धेत भारतीय खेळाडू व्यस्त असताना सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यावेळी बॅडमिंटन आणि बॉक्सिंग सामन्यांच्या वृत्तांकनात व्यस्त होते. पुरुष आणि महिला हॉकी संघ कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमाचे निमंत्रण क्रीडासचिव राजीव यादव यांच्याकडून आले होते.(वृत्तसंस्था)