नेमबाज टोकियोत दाखल, सोमवारपासून सराव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 09:00 AM2021-07-18T09:00:35+5:302021-07-18T09:01:22+5:30
नेमबाजी स्पर्धा असाका येथे टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या उपनगरात होणार आहेत.
क्वारंटाईनची गरज नाही
टोकियो : ऑलिम्पिकसाठी भारतीय नेमबाज शनिवारी पहाटे येथे दाखल झाले. त्यांना क्रीडाग्राममध्ये खोल्या मिळाल्या असून, क्वारंटाईन न होता सोमवारपासून खेळाडू सरावात व्यस्त होणार आहेत. नेमबाजी स्पर्धा असाका येथे टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या उपनगरात होणार आहेत. याचस्थळी १९६४ च्या ऑलिम्पिक नेमबाजीच्या स्पर्धा पार पडल्या होत्या.
भारतीय राष्ट्रीय नेमबाजी संघटनेचे महासचिव राजीव भाटिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेमबाज वास्तव्याच्या ठिकाणी पोहोचले. १९ जुलैपासून सराव सुरू होईल. सर्व खेळाडू क्रोएशियामधून दाखल झाल्याने त्यांना क्वारंटाईनचा नियम लागू होत नाही. नरिता विमानतळावर सहजपणे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या. विमानतळ ते निवासस्थान यादरम्यान तीन तासाचा प्रवास होता. एका खोलीत दोन खेळाडू वास्तव्यास आहेत.
नेमबाजीच्या स्पर्धा २४ जुलै रोजी सुरू होतील आणि पुढील दहा दिवस सुरू राहतील. भारतीय खेळाडू क्रोएशियातील जगरेब शहरात ८० दिवस वास्तव्यास होते. ऑलिम्पिकमध्ये यंदा विक्रमी १५ भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात आठ रायफल, पाच पिस्तूल आणि दोन स्कीट प्रकारातील नेमबाजांचा समावेश आहे.