भारतीय नेमबाजांचे ‘मिशन विश्वकप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 03:55 AM2017-09-01T03:55:00+5:302017-09-01T03:55:57+5:30
नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.
मॉस्को : नेमबाजी विश्वचषकाची अंतिम फेरी भारतात होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता गाठण्यासह भारताच्या २८ खेळाडूंना शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या आयएसएसएफ विश्व शॉटगन चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळविण्यासाठी कडव्या आव्हानांचा सामना करावा लागेल.
जगभरातील शॉटगन नेमबाजांसाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. कारण, चांगल्या कामगिरीसह नवी दिल्लीत पुढील महिन्यात आयोजित विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावण्याची संधी याच स्पर्धेद्वारे मिळेल. पाचही स्पर्धेतील पदकविजेते विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळतील. डबल ट्रॅपचे नेतृत्व २६ वर्षांचा कयनान चेनाई करेल. त्याने अलीकडे आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते. त्याच्या सोबतीला जोरावरसिंग आणि बिरेनदीपसिंग हे आहेतच. स्कीट प्रकारात मैराज अहमद खान हा भारताकडून पदकाचा प्रबळ दावेदार आहे. महिला गटात रश्मी राठोड आव्हान सादर करेल. अस्ताना येथे माहेश्वरी चौहान हिने स्कीटमध्ये आंतरराष्टÑीय पदक जिंकले होते. पुरुष स्कीट संघात मैराजशिवाय अंगदवीरसिंग बाजवा आणि शिराजसिंग; तर महिला ट्रॅप संघात राजेश्वरी कुमारी, श्रेयसी सिंग आणि सीमा तोमर आव्हान सादर करतील. ज्युनियर गटात १५ वर्षांचा शपथ भारद्वाज याच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. याशिवाय, मानवादित्यसिंग राठोड, लक्ष्य आणि अनंतजितसिंग नरुका हेदेखील पदकाचे दावेदार असतील. (वृत्तसंस्था)
भारताकडून आतापर्यंत केवळ अंकुर मित्तल हाच नवी दिल्लीच्या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याने दिल्ली आणि मेक्सिको येथील पहिल्या दोन फेºयांमध्ये रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले होते. डबल ट्रॅपचा तज्ज्ञ खेळाडू मित्तल याला सध्याच्या स्पर्धेतही पदकाची आशा आहे.
अंकुर मित्तलने याच महिन्यात अस्ताना येथे आशियाई शॉटगन स्पर्धेचे सुवर्ण जिंकले होते. संग्राम दहिया आणि मोहंमद असाब हेदेखील मित्तलसोबत स्पर्धेत सहभागी होणार आहेत.