भारताला मोठा झटका! देशाची 'सुवर्ण' कन्या हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 07:25 PM2023-06-15T19:25:45+5:302023-06-15T19:26:31+5:30
Asian Games 2023 : आशियाई स्पर्धा २०२३ चा थरार सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे.
Hima Das Injury : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ चा थरार सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा झटका बसला आहे. आगामी सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र, या स्पर्धेच्या आधीच भारताला सुवर्ण कन्या हिमा दासच्या रूपात झटका बसला आहे. कारण देशाची स्टार धावपटू आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दास एप्रिलमध्ये जखमी झाली होती, ज्यातून ती अद्याप बरी झालेली नाही.
दरम्यान, दुखापतीमुळे भारताची सुवर्ण कन्या आगामी स्पर्धेला मुकणार आहे. भारतीय ॲथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी ही माहिती दिली. याआधी २०१८ मध्ये हिमा दासने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
हिमा दास आशियाई स्पर्धेतून बाहेर
प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी सांगितले की, हिमा दासला दुखापत झाली आहे. तिच्या हाताला दुखापत असून पाठीचाही त्रास जाणवत आहे. वैद्यकीय तपासणी सुरू आहे, पण ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (AFI) धोरणानुसार ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. खरं तर याआधी ती मागील महिन्यात रांचीमध्ये आयोजित फेडरेशन कपमध्ये देखील खेळली नव्हती.
तसेच ज्या खेळाडूंना सूट देण्यात आली आहे त्यांच्याव्यतिरिक्त प्रत्येकाला सुरुवातीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे लागेल, त्यानंतरच ते आशियाई क्रीडा स्पर्धेत निवडीसाठी दावा करू शकतील, असे भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने स्पष्ट केले.