सर्वोत्तम कामगिरीसाठी भारतीय पथक सज्ज, टोकिये ऑलिंपिकनंतर मेरी कोम निरोप घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:24 AM2018-11-14T06:24:22+5:302018-11-14T06:25:22+5:30
मेरीकोम : टोकियो आॅलिम्पिकनंतर घेणार निरोप
नवी दिल्ली : पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणारी महिला बॉक्सर एम.सी. मेरीकोमला य्एआयबीए महिला विश्व चॅम्पियनशिपमध्ये स्वत:सह भारतीय पथकाकडून सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे. मेरीकोमने (४८ किलो) विश्व चॅॅम्पियनशिपमध्ये पाच सुवर्ण व एका रौप्यपदकासह एकूण सहा पदके पटकाविली आहेत. ती सहावे सुवर्णपदक पटकविण्यास उत्सुक आहे. मेरीकोम पूर्णपणे फिट असून २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आपल्या कारकिर्दीचा समारोप करण्यास इच्छुक आहे.
दहाव्या एआयबीए महिला विश्वचॅम्पियनशिपची ‘शुभेच्छा दूत’ असलेली मेरीकोम येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाली, ‘तयारी चांगली सुरू असून अनेक देशांच्या बॉक्सर्सविरुद्ध आम्ही सराव केला आहे. वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत सराव केल्यामुळे अनुभव मिळतो. प्रशिक्षकही सर्वांकडून मेहनत करवून घेत आहेत. आम्ही सर्व बॉक्सर्सही सर्वोत्तम तयारी करीत आहोत.’ फिनलँडची बॉक्सर मीरा पोटकोनेन (६० किलो) यावेळी उपस्थित होती. ती जानेवारी महिन्यात इंडिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आली होती. तिचा हा भारताचा दुसरा दौरा आहे. ती म्हणाली, ‘जानेवारीमध्येही इंडिया ओपनमध्ये सहभागी होण्यासाठी येथे आली होती आणि विजय नोंदवला होता. दुसºयांदा येथे आल्यामुळे आनंद झाला. मी विश्व चॅम्पियनशिपच्या तयारीसाठी अमेरिका व फ्रान्समध्ये शिबिरात सराव केला. तयारी बघता आगामी काही दिवसांमध्ये विश्व चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहे.’
प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी बंदीस्त सराव
मेरीकोम म्हणाली, ‘आम्ही ज्यावेळी विदेशात जातो त्यावेळी तेथील परिस्थितीसोबत जुळवून घ्यावे लागते. हा खेळाचा भाग आहे. प्रदूषण निश्चितच समस्या आहे. पण त्यापासून बचाव करण्यासाठी आम्ही बंदिस्त स्टेडियममध्ये सराव करीत आहोत.’
तीन अपत्यांची आई असलेल्या मेरीने फिटनेसबाबत बोलताना सांगितले, ‘मी पूर्ण फिट असून निश्चितच २०२० टोकियो आॅलिम्पिक खेळण्यास इच्छुक आहे.’ मेरीकोमने अलीकडेच आपल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्डकोस्टमध्ये सुवर्णपदक पटकावले होते.