भारतीय स्क्वॅश टीम प्रशिक्षकांविना
By admin | Published: July 21, 2014 02:01 AM2014-07-21T02:01:08+5:302014-07-21T02:01:08+5:30
ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय स्क्वॅश संघ राष्ट्रीय प्रशिक्षक साईरस पोचा यांच्याविनाच रवाना झाला आहे़
नवी दिल्ली : ग्लास्गो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय स्क्वॅश संघ राष्ट्रीय प्रशिक्षक साईरस पोचा यांच्याविनाच रवाना झाला आहे़ त्यामुळे खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले आहे़ प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे़
गेल्या दशकभरापासून राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे साईरस पोचा गत महिन्यात आशियाई टीम चॅम्पियनशिपसाठी संघासोबत गेले होते़ मात्र, शुक्रवारी ग्लास्गोला रवाना झालेल्या नऊ सदस्यीय टीमसोबत ते गेले नाहीत़ स्क्वॅश स्पर्धेला गुरुवापासून प्रारंभ होणार आहेत़
द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त पोचा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, काय झाले मला काहीच माहीत नाही़ या प्रकरणावर मला कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही़ मला आता केवळ एवढेच म्हणायचे आहे की, राष्ट्रकुलसारख्या प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या स्पर्धेसाठी मला संघासोबत जाता आले नाही, याची खंत आहे़ विशेष म्हणजे ग्लास्गोला गेलेल्या टीमसोबत मलेशियाचे परदेशी प्रशिक्षक सुब्रमण्यम सिंगारावेलू आणि महिला प्रशिक्षक भुवनेश्वरी कुमारी यांना पाठविण्यात आले आहे़
फिजिओथेरपिस्ट ग्रीम एवेरॉर्डही संघासोबत गेले आहेत़
ग्लास्गोहून एका खेळाडूने वृत्तसंस्थेला सांगितले की, साईरस आमच्यासोबत असते तर चांगले झाले असते़ आम्हाला सध्या त्यांची उणीव भासत आहे़ ते राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांनी आमच्यासोबत यायला हवे होते़ मात्र, ते का सोबत आले नाहीत हे आम्हाला माहीत नाही़ (वृत्तसंस्था)