इंग्लंड कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, ईशांतचं पुनरागमन
By admin | Published: November 2, 2016 01:47 PM2016-11-02T13:47:16+5:302016-11-02T14:36:46+5:30
इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. गोलंदाज ईशांत शर्माला संधी देण्यात आली असून तो पुनरागमन करत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - इंग्लंडविरुद्ध ९ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. सर्वांचं लक्ष असलेल्या फिट वेगवान गोलंदाज ईशांत शर्माला संधी देण्यात आली असून तो पुनरागमन करत आहे. तर हार्दिक पंड्याला संधी देण्यात आली आहे. संघाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीची आज बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत संघ जाहीर करण्यात आला. भारतीय संघाने यापूर्वीच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० ने पराभव केला असल्याने निवड समितीला पाच सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची निवड करताना काही बाबींवर विशेष भर द्यावा लागला.
वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा चिकुनगुनियातून सावरला असून, त्याचे पुनरागमन झालं आहे. त्याची न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड झाली होती; पण त्याला मालिकेत एकही सामना खेळता आला नाही. त्यानंतर तो दोन रणजी सामने खेळला आणि ४० पेक्षा अधिक षटके गोलंदाजी केली.
भारतीय संघ -
विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, गौतम गंभीर, उमेश यादव, अश्विन, रवींद्र जडेजा, जयंत यादव, हार्दिक पांड्या, उमेश, करुण नायर, अमित मिश्रा, सिद्धीमान साहा, चेतेश्वर पुजारा
न्यूझीलंडविरुद्ध कानपूरमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात सलामीवीर केएल राहुल दुखापतग्रस्त झाला आणि ईशांत शर्मा आजारी असल्यामुळे निवड समितीने अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर व ऑफ स्पिनर जयंत यादव यांना कोलकाता येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात पाचारण केले होते.
गंभीरला ईडन गार्डन्सवर खेळण्याची संधी मिळाली नाही; पण कोलकाता कसोटी सामन्यादरम्यान शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे दोन वर्षांच्या कालावधीनंतर गंभीरला इंदूरमध्ये कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. धवनच्या स्थानी करुण नायरला संघात स्थान देण्यात आले होते; पण त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी मिळाली नव्हती. जयंत यादवलाही दोन्ही कसोटी सामन्यात अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळाले नाही.
पाहुणा इंग्लंड संघ बुधवारी बांगलादेशहून भारतात दाखल होणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत त्यांना १-१ बरोबरीवर समाधान मानावे लागले.
As you know Rohit Sharma had a bad injury, he might also have to undergo surgery: MSK Prasad,Chief Selector pic.twitter.com/GL8g5mBMJ6
— ANI (@ANI_news) November 2, 2016
‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘इंग्लंड संघ येथे सराव सामना खेळणार नसून पहिल्या कसोटी सामन्यासाठी राजकोटला रवाना होण्यापूर्वी क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर केवळ ५ नोव्हेंबर रोजी सराव सत्रात सहभागी होणार आहे.’ सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, ‘सध्या निश्चित असलेल्या कार्यक्रमानुसार इंग्लंड संघ केवळ एका सराव सत्रात सहभागी होणार आहे. जर त्यांना अधिक सराव सत्राची गरज असेल, तर तशी व्यवस्था करण्यात येईल.’
इंग्लंड संघ ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ५ नोव्हेंबर रोजी राजकोटला रवाना होणार आहे. मालिकेतील अन्य कसोटी सामने विशाखापट्टणम (१७ ते २१ नोव्हेंबर), मोहाली (२६ ते ३० नोव्हेंबर), मुंबई (८ ते १२ डिसेंबर) आणि चेन्नई (१६ ते २० डिसेंबर) येथे खेळल्या जाणार आहेत.