माफी मागताच अंकित भारतीय संघात
By admin | Published: May 23, 2015 01:09 AM2015-05-23T01:09:44+5:302015-05-23T01:09:44+5:30
लांब उडीचा खेळाडू अंकित शर्मा याला पुढील महिन्यात चीनमध्ये आयोजित आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले.
नवी दिल्ली : लांब उडीचा खेळाडू अंकित शर्मा याला पुढील महिन्यात चीनमध्ये आयोजित आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले. एनआयएस पतियाळाऐवजी त्रिवेंद्रम येथील साई सेंटरमध्ये सराव करणाऱ्या अंकितने राष्ट्रीय महासंघाला कळविले नव्हते. यासंदर्भात त्याने लेखी माफी मागितली आहे.
वुहान येथे ३ ते ७ जून या कालावधीत स्पर्धेचे आयोजन होईल. तो पदकाचा दावेदार आहे. १४ जून रोजी जाहीर झालेल्या भारतीय संघातून त्याला वगळण्यात आले होते. त्याने पात्रता फेरी मात्र उत्तीर्ण केली होती, पण त्रिवेंद्रम येथे साई केंद्रात सरावासाठी त्याने स्वमर्जीने पतियाळा येथील राष्ट्रीय शिबिर सोडल्याबद्दल भारतीय अॅथलेटिक्स संघटना नाराज होती. एएफआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंकित आम्हाला कुठलीही सूचना न देता पतियाळा येथील शिबिरातून बाहेर पडला. एखादा खेळाडू सरावासाठी
स्वत: प्रशिक्षणाचे ठिकाण निवडू शकत नाही. अंकितने आता आमच्याकडे लेखी माफी मागितली आहे. त्याची माफी मान्य करीत
आम्ही संघात स्थान दिले. यापुढे
अशी चूक होणार नसल्याचे
अंकितने माफीनाम्यात लिहिले
आहे.’ दरम्यान प्रतिभावान वेगवान धावपटू दुतीचंद हिला देखील भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिला २७ मे रोजी महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले दौडीत सरस कामगिरी करावी लागेल. वैयक्तिक स्पर्धेसाठी ती अपयशी ठरली होती.
आयएएएफच्या लिंग परीक्षण धोरणाविरुद्ध स्वित्झर्लंडच्या लुसानेस्थित क्रीडा लवादापुढे केलेल्या अपिलावर निर्णय येईस्तोवर दुतीला वुहानच्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
अंकितचा समावेश केल्यानंतर भारत पुरुषांच्या लांब उडीत दोन खेळाडू उतरवेल. के. प्रेमकुमार सध्या अमेरिकेत सराव करीत आहे. अलीकडे प्रेमने दोनदा ८ मीटर लांब उडी मारली आहे. अंकितने यंदा फेडरेशन चषकात ७.९९ मीटरसह सुवर्ण जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्यावेळी त्याने ८ मीटर लांब उडी घेत सुवर्ण जिंकले होते. प्रेमकुमार व अंकित यांच्याशिवाय या मोसमात चीन, जपान तसेच सौदी अरबचा एक खेळाडू ८ मीटरचा अडथळा पार करू शकले.