भारतीय संघाने २७ पदकांसह पटकावले दुसरे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 05:45 AM2019-03-18T05:45:41+5:302019-03-18T05:46:03+5:30
भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.
हाँगकाँग - भारतीय मुलांच्या रिले संघाने युवा आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकावर कब्जा केला. त्याचवेळी मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले. त्याचबरोबर शनिवारी स्पर्धेत १०० मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्ण मिळवणाऱ्या भारताच्या अवंतिका नराळेने रविवारीही भारताला दोन रौप्य मिळवून दिली. भारताने एकूण २७ (८ सुवर्ण, १० रौप्य व ९ कांस्य) पदकांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले आहे. चीनने सर्वाधिक १२ सुवर्ण पदकांसह १० रौप्य व ९ कांस्य अशी ३१ पदकांची कमाई केली. जपानने ६ सुवर्ण, ८ रौप्य व ६ कांस्य अशा २० पदकांसह तिसरे स्थान मिळवले.
भारतीय मुलांच्या मिडले रिले संघाने सुवर्ण कामगिरी केली. करण हेगिस्टे, शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी व अब्दुल रझाक यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने १:५४.०४ मिनिटांची वेळ नोंदवत सुवर्ण पदकावर कब्जा केला. भारतीयांच्या शानदार वर्चस्वापुढे श्रीलंका (१:५५.०४) व चीनच्या (१:५५.४५) संघाला अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकांवर समाधान मानावे लागले.
मुलींच्या मिडले रिले संघातही अवंतिका, दीप्तीसह पणिता पिंचाई व सुकंदा पी. यांचा समावेश असलेल्या भारताला २:१०.८७ मिनिटांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या मुलींनी सुवर्ण पटकावत २:१०.७१ मिनिटांची वेळ दिली. कझाकिस्तानने कांस्य जिंकले.
शनिवारी ऐतिहासिक सुवर्ण जिंकणाऱ्या पुण्याच्या अवंतिका नराळेने रविवारी आणखी दोन पदकांची कमाई केली. तिने २०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले. याच शर्यतीत भारताच्याच दीप्ती जीवांजीने कांस्य जिंकले. अवंतिकाने २४.२० सेकंद आणि दीप्तीने २४.७८ सेकंदांची वेळ नोंदवली. मुलींच्या रिले संघातही अवंतिकाचा सहभाग होता.
शनिवारी १०० मीटर शर्यतीत पुण्याच्या १५ वर्षीय अवंतिकाने ११.९७ सेकंदांच्या वेळेसह बाजी मारत युवा गटात आशियातील सर्वात जलद धावपटू होण्याचा मान पटकावला होता. मुलींच्या २०० मीटर शर्यतीत चीनच्या युतिंग लीने २३.८३ सेकंदांची वेळ नोंदवत स्पर्धा विक्रमासह सुवर्ण पटकावले. तिच्या वेगापुढे अवंतिका आणि दीप्ती यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, नालूबोथू शनमिगा श्रीनिवास (२०० मीटर) याने रौप्य, ३ हजार मीटर शर्यतीमध्ये अमित जांगिर याने रौप्य, पूजाने ८००मी शर्यतीत रौप्य, ८००मी मुलांच्या शर्यतीत महेश बाबू आणि सुमित खारब यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य, अमनदीपसिंग धालिवालने गोळाफेकीत रौप्य व चंथिनी चंदनने १५००मी शर्यतीत कांस्य पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. (वृत्तसंस्था)
मेडले रिले शर्यतीमध्ये भारताला सुवर्ण यश मिळवून देत भारतीय धावपटूंनी तिरंगा अभिमानाने फडकाविला. यावेळी (डावीकडून) शनमुगा नालुबोठू, शशिकांत अंगदी, करण हेगिस्टे आणि अब्दुल रझाक. मुलांच्या संघाने केलेल्या सुवर्ण यशानंतर मुलींच्या रिले संघाने भारताला रौप्य पदक मिळवून दिले.