भारतीय संघाचा अभिमान वाटतो - साक्षी धोनी
By Admin | Published: March 27, 2015 11:04 AM2015-03-27T11:04:02+5:302015-03-27T11:09:10+5:30
विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय संघावर टीका होत असतानाच साक्षी धोनीने मात्र आपल्याला त्यांचा अभिमान वाटत असल्याचे सांगत संघाचे कौतुक केले आहे.
>ऑनलाइन लोकमत
रांची, दि. २७ - विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यामुळे टीम इंडियावर चहूबाजूने टीकेची झोड उठत आहे. या पराभवाबद्दल चाहते अतिशय नाराज असून अनेक ठिकाणी भारतीय खेळाडूंची पोस्टर्स जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. मात्र असे असतानाच कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने हिने टीम इंडियाला पाठिंबा दर्शवला असून आपल्याला संघाचा अभिमान वाटतो असे म्हटले आहे.
' जय-पराजय हा खेळाचाच एक भाग आहे. सामन्यात भारतीय संघाने कडवी लढत दिली. मला त्यांचा अभिमान वाटतो. आत्तापर्यंत केलेल्या सर्व त्यागाचे चीज झाले ' असे ट्विट साक्षीने केले असून तिने एकाप्रकारे भारतीय संघाचे समर्थनच केले आहे. कालच्या पराभवानंतर टीम इंडियावर सर्व स्तरांतून टीका होत असतानाच साक्षीने मात्र संघाला पाठिंबा दर्शवला आहे.
साक्षीने गेल्या महिन्यात एका गोड मुलीला जन्म दिला असून 'झिवा' असे तिचे नाव ठेवण्यात आले आहे. मात्र विश्वचषक स्पर्धेत व्यस्त असल्याने महिन्याभरानंतरही महेंद्रसिंग धोनीला अद्याप आपल्या मुलीला भेटता आलेले नाही.