भारतीय संघाने ‘चॅम्पियन’ संधी साधली - धनराज पिल्ले

By admin | Published: June 21, 2016 09:22 PM2016-06-21T21:22:18+5:302016-06-21T21:40:39+5:30

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासामध्ये आम्ही कधीच फायनल खेळलो नाही. मात्र युवा संघाने यंदा हे स्वप्न पुर्ण करुन अभिमानास्पद कामगिरी केली. ज्याप्रकारे त्यांनी

Indian team got 'champion' opportunity - Dhanraj Pillay | भारतीय संघाने ‘चॅम्पियन’ संधी साधली - धनराज पिल्ले

भारतीय संघाने ‘चॅम्पियन’ संधी साधली - धनराज पिल्ले

Next

- रोहित नाईक

मुंबई, दि.21 -  चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासामध्ये आम्ही कधीच फायनल खेळलो नाही. मात्र युवा संघाने यंदा हे स्वप्न पुर्ण करुन अभिमानास्पद कामगिरी केली. ज्याप्रकारे त्यांनी अंतिम सामन्यात जगज्जेत्या आॅस्टे्रलियाला झुंजवले ते जबरदस्त होते. त्यामुळेच आगामी आॅलिम्पिकची पुर्वतयारी म्हणून मिळालेली चॅम्पियन ट्रॉफीची सुवर्ण संधी भारताने योग्यपणे साधली आहे,’’ असे अभिमानास्पद वक्तव्य हॉकी लिजंड धनराज पिल्ले याने ‘लोकमत’शी बोलताना केले. धनराजने सांगितले की, ‘‘अजून आॅलिम्पिकसाठी आपल्याकडे सुमारे दिड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. खेळाडूंना एकच सल्ला देईल की, दुखापतीपासून स्वत:ला दूर ठेवा. एकाही खेळाडूला दुखापत झाली तर ते आपल्याला खूप महागात पडू शकते. स्वत:च्या शरीराकडे चांगले लक्ष देऊन दुखापतीपासून दूर रहा.’’ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये गोलरक्षक पीआर श्रीजेश याचा खेळ भारतासाठी निर्णायक ठरला. त्याविषयी धनराज म्हणाला की, ‘‘श्रीजेश खरंच वर्ल्ड नंबर वन गोलकीपर आहे. अनेक मॅच त्याने आपल्या जीवावर, जिंकवून दिल्या आहेत. तो जगातील सर्वोत्तम गोलकीपरपैकी एक असल्याचे जाहीरही झाले आहे. आता केवळ, त्याला आॅलिम्पिकमध्ये बघण्याची उत्सुकता आहे. मी चार आॅलिम्पिक खेळलो आणि प्रत्येक वेळी पोडियम फिनिश करण्याचे स्वप्न होते. पण दुर्दैवाने ते स्वप्न पुर्ण झाले नाही. पण श्रीजेश आणि टीम हे स्वप्न नक्कीच पुर्ण करतील, याची खात्री आहे.’’ त्याचप्रमाणे, ‘‘माझ्या शुभेच्छा केवळ हॉकी टीमपुरता नसून आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या सर्व खेळाडूंना आहेत. कोणतेही दडपण न घेता खेळाचा आनंद घेत, देशासाठी पदक जिंका. तिरंगा अभिमानाने फडकावून सुखरुपपणे भारतात या,’’ असेही धनराजने सांगितले.

ओल्टमन्स यांचे अचूक प्रयोग...

भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांचे कौतुक करताना धनराज म्हणाला, ‘‘सरदारा सिंगला एक प्रयोग म्हणून चॅम्पियन्स स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली होती. कोच रोलंट ओल्टमन्स यांना वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित युवा खेळाडूंची कामगिरी पाहायची होती व युवांनी स्वत:ला सिध्द केले. सुलतान अझलन शाह स्पर्धेतही काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तरीही भारताने फायनलमध्ये धडक मारली. विशेष म्हणजे ओल्टमन्स सध्या जे काही करीत आहेत त्याचा उद्देश केवळ आॅलिम्पिक मेडल हेच आहे.

आॅलिम्पिकसाठी जाणाऱ्या सर्वच भारतीयांसाठी सांगू इच्छितो की, तुम्ही आॅलिम्पिक विलेजला जाल, तेव्हा सुमारे 15 हजार अ‍ॅथलिट तिथे असतील. तिथे महान खेळाडू असतात. जेव्हा मी माझा पहिला आॅलिम्पिक खेळलो होतो तेव्हा कार्ल लुईसला बघण्यास मी खूप उतावीळ झालेलो. त्यांची प्रॅक्टीस सुरु असताना आम्ही तिथेच बसायचो आणि कधीकधी आमचा खेळही विसरुन जायचो. त्यामुळे आपण ज्या उद्देशाने जातोय ते कायम मनात ठेवा. आधी आपले उद्देश पुर्ण करा. मोठ्या खेळाडूंना नक्की भेटा, फोटो काढा, पण आपल्या टार्गेटकडे कायम लक्ष असू द्या.

- धनराज पिल्ले

Web Title: Indian team got 'champion' opportunity - Dhanraj Pillay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.