भारतीय संघाला सावधगिरी बाळगावी लागेल
By admin | Published: June 17, 2017 02:41 AM2017-06-17T02:41:09+5:302017-06-17T02:41:09+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारताकडून पराभव स्वीकारणारा पाकिस्तान संघ अंतिम फेरी गाठेल, असे कुणालाही वाटले नसेल.
- अयाझ मेमन
(संपादकीय सल्लागार)
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीच्या लढतीत भारताकडून पराभव स्वीकारणारा पाकिस्तान संघ अंतिम फेरी गाठेल, असे कुणालाही वाटले नसेल. अनुभव व कौशल्य याचा विचार करता हा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतही नव्हता.
पण, सट्टेबाज व क्रिकेट पंडितांचे अंदाज खोटे ठरवित आता या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी अंतिम लढतीत पाकिस्तानची गाठ भारतासोबत पडणार आहे, हे विशेष. चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम लढत स्वप्नवत होणार असल्याची प्रचिती आली आहे.
दुसऱ्या उपांत्य लढतीत भारताने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर अंतिम लढतीबाबत वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. या अंतिम लढतीच्या निमित्ताने रविवारी उपखंडातील क्रिकेट ज्वर शिगेला पोहोचलेला असेल, यात कुठलीच शंका नाही.
अॅशेस मालिकेचे आकर्षण अधिक असले तरी भारत-पाकिस्तान सामन्याची कुठल्याही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये रंगत न्यारीच असते. जवळ-जवळ दोन अब्ज लोक सीमेच्या अल्याड-पल्याड क्रिकेटचे चाहते आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले आहे. उभय संघांदरम्यान ज्या वेळी लढत होते ती ब्लॉकबस्टर असते. या लढतीची उंची मोजक्याच खेळांना गाठता येते.
भावनांचा बांध फुटतो आणि पराभव कुठल्याही देशाला मान्य नसतो. एका अर्थाने विचार केला तर भारत-पाक केवळ सामना न राहता त्याचा वेगळ्याच पातळीवर विचार केला जातो. दरम्यान, माझ्या मते क्रिकेट हे मूळ आहे.
क्रिकेट सुरू असेल तर शत्रुता विसरण्यास भाग पाडते आणि शांतता निर्माण करण्यासाठी विचार करण्याबाबत पुन्हा संधी प्रदान करते.
मी भारत-पाकिस्तान क्रिकेटच्या राजकीय बाबींवर चर्चा करणार नसून रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम लढतीत उभय संघांच्या शक्यतेबाबत चर्चा करणार. सध्याच्या घडीला तेच महत्त्वाचे आहे.
कागदावर व सध्याच्या फॉर्मचा विचार करता भारत स्पष्टपणे प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येते. श्रीलंकेविरुद्धच्या अपयशानंतरही भारताची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल शानदार होती. माझ्या मते त्या पराभवानंतर भारतीय संघाला ताळमेळ साधता आला व लयही गवसली. आयसीसी क्रमवारीतील अव्वल संघ दक्षिण आफ्रिकेने भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणापुढे गुडघे टेकले. त्या लढतीत लक्ष्याचा पाठलाग करताना भारतापुढे सोपे आव्हान होते. उपांत्य फेरीत बांगलादेशचा तर सुपडा साफ केला.
भारताची आघाडीची फळी शानदार आहे. त्यामुळे युवराज सिंग, एम.एस. धोनी व केदार जाधव यांना फलंदाजी करण्याची विशेष संधी मिळाली नाही. तुलना केली तर गोलंदाजीची बाजूही कमकुवत नाही. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली.
कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या भूमिकेकडेही डोळेझाक करता येणार नाही. सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या शोधात विराटने प्रसंगी आक्रमकता व कठोरताही दाखविली आहे. कुठल्याही टप्प्यात प्रत्येक सामना जिंकण्याची महत्त्वाकांक्षा व भूक त्याच्यात दिसून आली. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास भारतीय संघ म्हणजे शिकार करण्यास निघालेल्या शिकाऱ्यांचा समूह आहे.
भारताच्या उलट पाकिस्तानचे आहे. त्यांनी नशिबाच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारली. सलामी लढतीतील पराभवानंतर डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे ज्या वेळी लढत थांबली त्या वेळी पाकिस्तान विजयाच्या स्थितीत होता, असे म्हणता येईल.
अखेरच्या साखळी लढतीत श्रीलंकेच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास मदत मिळाली. उभय संघांना अनेक चुका करताना बघणे हास्यास्पद होते. शेवटी मनोधैर्य ढासळलेल्या श्रीलंका संघाने एकापाठोपाठ एक झेल सोडले आणि अखेर त्यांना त्याचे मोल द्यावे लागले.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत मैदानावर पाकिस्तान संघाचे एकदम वेगळे रूप अनुभवायला मिळाले. त्यांची गोलंदाजी शानदार होती. युवा हसन अलीने स्वत:ला स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. क्षेत्ररक्षणातही नाट्यमय सुधारणा दिसून आली. आघाडीच्या दोन्ही फलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. पाकिस्तानला गवसलेला सूर भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचे मानून सावध व्हायला हवे.
या स्पर्धेत अनेक चढ-उतार अनुभवायला मिळाले. खेळात उलटफेर होणे नवी बाब नाही. त्यामुळे भारतीय संघाला गाफिल राहून चालणार नाही. खेळाच्या भाषेत सांगायचे झाल्यास भारताने चेंडूवरील नजर ढळू द्यायला नको.