जागतिक अजिंक्यपदसाठी भारतीय संघ सज्ज
By admin | Published: November 2, 2016 03:44 AM2016-11-02T03:44:23+5:302016-11-02T03:44:23+5:30
इंग्लंडमध्ये होणाऱ्या ७ व्या जागतिक कॅरम अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
मुंबई : इंग्लंडमध्ये होणाऱ्या ७ व्या जागतिक कॅरम अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ७ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत इंग्लंड, बर्मिंगहम येथील बादशाह पॅलेस येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली येथे सुरु असलेल्या संघाच्या सराव शिबीराला केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
इंग्लंडमध्ये होणाऱ्या या जागतिक स्पर्धेसाठी एकूण १७ देशांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेसाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली असून या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने दिल्ली येथे ७ दिवसांच्या विशेष प्रशिक्षण शिबीरात सहभाग घेतला. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी शिबीराला भेट देऊन खेळाडूंशी संवाद साधत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकी ५ पुरुष व महिला खेळाडूंसह प्रशिक्षक आणि दोन संघ व्यवस्थापक असा १३ सदस्यांचा भारतीय चमू स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. ५ नोव्हेंबरला भारतीय संघ इंग्लंडसाठी प्रस्थान करणार असल्याची माहिती महाराष्ट्र कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार यांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
>भारतीय संघ :
पुरुष : रियाझ अकबर अली, संदीप देवरुखकर, प्रशांत मोरे, आर. एम. शंकरा
महिला : काजल कुमारी, एस. अपूर्वा, परिमला देवी, तुबा सेहर
आय. सी. एफ. थेट प्रवेश : योगेश परदेशी ( पुरुष एकेरी) व रश्मीकुमारी (महिला एकेरी)
प्रशिक्षक : अरुण केदार
संघ व्यवस्थापक : पी. एस. बच्छेर व भारत भूषण