भारतीय महिलांनी उडविला अमेरिकेचा ५-१ असा धुव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 03:10 AM2019-11-02T03:10:22+5:302019-11-02T06:49:04+5:30

पूर्णपणे हार पत्करलेल्या अमेरिकेकडून ५४व्या मिनिटाला पुनरागमनाचा प्रयत्न झाला. एरिन मटसनने गोल करत संघाला आत्मविश्वास मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

Indian women blow up USA 2-4 | भारतीय महिलांनी उडविला अमेरिकेचा ५-१ असा धुव्वा

भारतीय महिलांनी उडविला अमेरिकेचा ५-१ असा धुव्वा

googlenewsNext

भुवनेश्वर : भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेची धमाकेदार सुरुवात करताना आपल्या पहिल्या सामन्यात जागतिक
क्रमवारीत १३व्या स्थानी असलेल्या अमेरिकेला ५-१ असे लोळवले. जबरदस्त सांघिक खेळ केलेल्या भारतीयांना रोखणे अमेरिकेला अखेरपर्यंत जमले नाही. गुरजीत कौरने २ गोल करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताचा विजय गृहीतच होता. मात्र, ज्याप्रकारे भारतीय महिलांनी एकजुटीने खेळ केला ते सर्वात आनंददायी होते. खेळाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी वरचढ ठरताना अमेरिकेला कोणतीही संधी दिली नाही. विशेष म्हणजे मध्यंतराला भारताने १-० अशी आघाडी घेतली होती आणि यानंतर चार धामाकेदार गोल करत भारतीयांनी अमेरिकेच्या आव्हानातली हवाच काढली. भारतीयांनी केवळ ११ मिनिटांमध्ये चार गोल करत दबदबा राखला.

सामन्यातील २८व्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर लिलिमा मिंजने गोल करत भारताला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर ४०व्या मिनिटाला शर्मीला देवीने गोल करत भारताची आघाडी २-० अशी वाढवली. अमेरिका या धक्क्यातून सावरत असतानाच ४२व्या मिनिटाला गुरजीत कौरने भारताचा तिसरा गोल करत संघाला सामन्यावर घट्ट पकड मिळवून दिली. या दमदार आघाडीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीयांनी सातत्याने अमेरिकेच्या गोलपोस्टवर हल्ले केले. त्यात नवनीत कौर (४६वे मिनिट) आणि पुन्हा एकदा गुरजीत कौर (५१ मिनिट) यांनी गोल करत भारताला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून देत सामन्याचा निकालही स्पष्ट केला.

यावेळी पूर्णपणे हार पत्करलेल्या अमेरिकेकडून ५४व्या मिनिटाला पुनरागमनाचा प्रयत्न झाला. एरिन मटसनने गोल करत संघाला आत्मविश्वास मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर भारतीय बचावफळीने जबरदस्त प्रदर्शन करताना अमेरिकन्सला आपल्या गोलक्षेत्रापासून दूर ठेवण्यात यश मिळवले.

पुरुषांचाही विजय
भारतीय पुरुष संघानेही जबरदस्त विजय मिळवताना तुलनेत दुबळ्या असलेल्या रशियाचे आव्हान ४-२ असे परतावले. यासह भारतीय पुरुष व महिला संघ ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यापासून अत्यंत जवळ पोहचले आहेत. दोन्ही संघ शनिवारी आपला दुसरा सामना खेळतील.

मनदीप सिंगने २४व्या आणि ५३व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयामध्ये निर्णायक कामगिरी केली. तसेच हरमनप्रीत सिंग याने ५व्या, तर सुनीलने ४८व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल केले.

रशियाकडून अँड्री कुरेव याने १७व्या आणि अखेरच्या क्षणी जॉर्जी अरुसिया यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Web Title: Indian women blow up USA 2-4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी