भारतीय महिलांचा पराभव
By admin | Published: February 3, 2016 03:09 AM2016-02-03T03:09:14+5:302016-02-03T03:09:14+5:30
नुकत्याच झालेल्या महिला टी-२० क्रिकेट मालिकेत आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे लोळविल्यानंतर भारतीय महिला संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले
कॅनबेरा : नुकत्याच झालेल्या महिला टी-२० क्रिकेट मालिकेत आॅस्टे्रलियाला त्यांच्याच भूमीत २-१ असे लोळविल्यानंतर भारतीय महिला संघाला पहिल्या एकदिवसीय सामन्यात मात्र पराभवाचे तोंड पाहावे लागले. सर्वच बाबतीत यजमानांनी वर्चस्व राखताना टीम इंडियाला तब्बल १०१ धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह आॅसी महिलांनी ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून यजमानांनी प्रथम फलंदाजी करताना एलिस पेरी (९०) आणि अॅलेक्स ब्लॅकवेल (११४) यांच्या शानदार तडाख्याच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २७६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना
भारताचा डाव ४६.५ षटकांत केवळ १७५ धावांत संपुष्टात आला. भारतीयांनी डावाची सुरुवात अत्यंत संथ करताना विनाकारण दबाव ओढावून घेतला. त्यात एलीस पेरी हिने गोलंदाजीतही कमाल करताना ४५ धावांत ४ खंदे फलंदाज बाद करून भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडले. मेगन एस., जेस जोनासेन आणि ग्रेस हॅरीस यांनीदेखील प्रत्येकी एक बळी घेताना पेरीला चांगली साथ दिली. धावफलक : आॅस्टे्रलिया : ५० षटकांत ६ बाद २७६ धावा (अॅलेक्स ब्लॅकवेल ११४, एलिस पेरी ९०; शिखा पांडे ३/३२) वि. वि. भारत : ४६.५ षटकांत सर्वबाद १७५ धावा (हरमनप्रीत कौर ४२, झुलन गोस्वामी २५; एलिस पेरी ४/४५)