भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडला रवाना
By admin | Published: May 10, 2017 01:01 AM2017-05-10T01:01:39+5:302017-05-10T01:01:39+5:30
न्यूझीलंडविरुद्ध १४ मेपासून प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघ आज मंगळवारी रवाना झाला.
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध १४ मेपासून प्रारंभ होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला हॉकी संघ आज मंगळवारी रवाना झाला.
भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने यापूर्वी कॅनडातील व्हेंकूवरमध्ये महिला हॉकी विश्व लीगचा दुसरा टप्पा जिंकला होता. भारतीय संघ जोहान्सबर्ग येथे खेळल्या जाणाऱ्या महिला हॉकी विश्व लीग सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे.
राणीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात सुशील चानू, रितू राणी, दीप ग्रेस इक्का, सुनीता लाकडा, वंदना कटारिया, नवजेयत कौर यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.
संघ रवाना होण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना राणी म्हणाली, ‘आमच्या खेळात बराच फरक पडला आहे. आमचे फिटनेस, तंत्र आणि मार्किंग सुधारले आहे.’
नवे प्रशिक्षक जोएर्ड मारिने यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने भोपाळमध्ये बेलारुस संघाचा मालिकेत ५-० ने पराभव केला होता. प्रशिक्षक म्हणाले, ‘आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेच्या निमित्ताने आपल्यातील उणिवा दूर करता येतील. त्याचा आम्हाला विश्व लीग सेमीफायनलमध्ये लाभ होईल.’ (वृत्तसंस्था)