भारतीय महिला मुख्य फेरीत
By admin | Published: March 3, 2016 04:08 AM2016-03-03T04:08:56+5:302016-03-03T04:08:56+5:30
भारतीय महिला संघाने जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना मुख्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला
क्वालालंपूर : भारतीय महिला संघाने जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखताना मुख्य फेरीमध्ये दिमाखात प्रवेश केला. द्वितीय श्रेणी गटात आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारतीयांनी क्रोएशियाचा ३-० असा धुव्वा उडवून मुख्य फेरी गाठली. दुसऱ्या बाजूला भारतीय पुरुषांनी स्वित्झर्लंडविरुद्ध ३-० असा दणदणीत विजय मिळविला.
एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताच्या महिलांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करताना क्रोएशियाच्या खेळाडूंना अखेरपर्यंत संधी दिली नाही. मणिका बत्राने लिया राकोवाचा ११-८, १२-१०, ८-११, ११-६ असा पराभव करून भारताला आघाडी मिळवून दिल्यानंतर मौमा दासने युआन तियानचा १३-११, ९-११, ११-८, ११-२ असा पराभव करून संघाला २-०
अशी भक्कम आघाडी मिळवून
दिली. यानंतर शामिनीने अपेक्षित बाजी मारून इवाना टुबिकानेकचा
१४-१२, ११-८, ७-११, ११-३ असा पाडाव करताना भारताच्या विजयावर शिक्का मारला.
दुसऱ्या बाजूला नायजेरियाविरुद्ध झालेल्या चुका सुधारताना भारताच्या पुरुषांनी आपल्या लौकिकानुसार खेळ करून स्वित्झर्लंडचे आव्हान ३-० असे परतवले. सौम्यजित घोषने सलामीला एलिया श्मीडला ११-८, ११-७, ८-११, ११-३ असे नमवून आघाडी मिळवून दिल्यानंतर अचंत शरथ कमलने लियोनेल वेबरचा ११-७, ११-७, ११-७ असा धुव्वा उडवून भारताला विजयी मार्गावर आणले. यानंतर जी. साथियनने आक्रमक खेळ करताना निकोलस चैंपोडचा ११-७, ११-५, ११-३ असा फडशा पाडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘फ’ गटात समावेश असलेल्या भारताचा अखेरचा साखळी सामना गुरुवारी स्लोवाकियाविरुद्ध होईल.