भारतीय महिला उपांत्य फेरीत
By Admin | Published: April 4, 2017 12:07 AM2017-04-04T00:07:42+5:302017-04-04T00:07:42+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकी विश्व लीगच्या ‘अ’ गटातील दुसऱ्या लढतीत सोमवारी बेलारुसचा १-० ने पराभव केला.
वेस्ट वँकुवर (कॅनडा) : वंदना कटारियाने नोंदवलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने महिला हॉकी विश्व लीगच्या ‘अ’ गटातील दुसऱ्या लढतीत सोमवारी बेलारुसचा १-० ने पराभव केला. भारताने यापूर्वी सलामी लढतीत उरुग्वेचा शूटआऊटमध्ये ४-२ ने पराभव केला होता. आजच्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.
वंदनाने २६ व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला. त्याआधी, पहिल्या क्वार्टरमध्ये उभय संघांना गोल नोंदविता आला नाही. भारताला २१ व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यावर गोलची नोंद झाली नाही.
त्यानंतर २२ व्या मिनिटाला भारतीय गोलकिपर सविताने पेनल्टी कॉर्नरवर बेलारुसचा गोल थोपविला. वंदनाने नोंदविलेल्या गोलनंतर भारतीय संघाने बचावात्मक पवित्रा स्वीकारला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला मिळालेले तिन्ही पेनल्टी कॉर्नर वाया गेले. (वृत्तसंस्था)