भारतीय महिला हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात
By admin | Published: September 9, 2015 02:28 AM2015-09-09T02:28:17+5:302015-09-09T02:28:17+5:30
पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे कोरिया आणि सिंगापूर यांचा पार चुराडा करून दणक्यात सुरुवात केलेल्या भारताचा महिला
नवी दिल्ली : पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे कोरिया
आणि सिंगापूर यांचा पार चुराडा
करून दणक्यात सुरुवात केलेल्या भारताचा महिला हॉकी संघ सध्या फुल फॉर्ममध्ये आहे. बुधवारी होणाऱ्या चीनविरुद्धच्या सामन्यातदेखील असाच धमाकेदार विजय मिळवून ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ दणक्यात हॅट्ट्रिक नोंदवण्यासाठी सज्ज आहे.
कोरिया आणि सिंगापूर यांचा अनुक्रमे १३-० व १२-० असा फडशा पाडून आगेकूच केलेल्या भारतीय संघाचे यजमान चीनपुढे तगडे आव्हान असेल. याच वेळी चीननेदेखील कोरियाला ११-० असे नमवून विजयी सलामी दिली असल्याने भारतीय संघ यजमानांना कमी लेखण्याची चूक करणार नाही. तसेच, यापूर्वी हॉलंडमध्ये झालेल्या २१ वर्षांखालील निमंत्रित महिला स्पर्धेत चीनने भारताला ४-२ असे पराभूत केले होते. मात्र, सध्या चित्र वेगळे असून पूर्ण आत्मविश्वासाने खेळणारा भारताचा महिला संघ या पराभवाचा वचपा काढण्यास आतुर आहे. चिनी खेळाडू दूरवरचे पास करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या पासवर लक्ष केंद्रित करून त्यावर गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याचा तसेच चिनी गोलक्षेत्रात मुसंडी मारून यजमानांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न भारतीय महिलांचा असेल. (वृत्तसंस्था)
चीनविरुद्ध पेनल्टी कॉर्नरची प्रत्येक संधी गोलमध्ये रूपांतरित करण्यावर आमचा भर असेल. पहिल्या दोन सामन्यांतील दणदणीत विजयामुळे आमचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असून, यजमानांविरुद्ध आम्ही अधिक आक्रमक खेळ करू.
- रितू राणी, कर्णधार
पहिल्या दोन सामन्यांतील तुफान फॉर्म यजमानांविरुद्धसुद्धा आम्ही कायम ठेवू. साखळी फेरीतील प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असून, त्या जोरावरच आम्हाला बाद फेरीसाठी आत्मविश्वास मिळेल.
- बलजितसिंग, प्रशिक्षक