भारतीय महिलांचा जेतेपदाचा ‘चौकार’
By admin | Published: January 5, 2017 02:17 AM2017-01-05T02:17:11+5:302017-01-05T02:17:11+5:30
भारताच्या महिला फुटबॉल संघाने अपेक्षेप्रमाणे आपला दबदबा राखताना बांगलादेशचा ३-१ असा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सिलिगुडी : भारताच्या महिला फुटबॉल संघाने अपेक्षेप्रमाणे आपला दबदबा राखताना बांगलादेशचा ३-१ असा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे या स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग १९ सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यामध्ये १८ विजय व एक अनिर्णित अशी कामगिरी भारतीय महिलांनी केली आहे.
कंचनगंजा स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात स्ट्रायकर दांगमेई ग्रेसने १२व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल केला. बांगलादेशची गोलकीपर सबीना अख्तरला सहजपणे चकवा देत ग्रेसने शानदार गोल केला. १७व्या मिनीटाला भारताला दुसरा गोल करण्याची संधी मिळाली. परंतु, कमल देवीने केलेला हेडर गोलपोस्टच्या अगदी जवळून गेला.
यानंतर, बांगलादेशने ४०व्या मिनीटाला सीरत जहां शोपनाच्या जोरावर १-१ अशी बरोबरी साधली. मध्यंतराला ही बरोबरी कायम राहिली. मात्र, दुसऱ्या सत्रात भारताने आक्रमक खेळ केला. ६०व्या मिनिटाला बाला देवीला बांगलादेशच्या खेळाडूने गोलक्षेत्रात धक्का दिल्याने पंचांनी भारताला पेनल्टी किक बहाल केली. ही नामी संधी साधताना सस्मिता मलिकने भारताची आघाडी २-१ अशी केली. (वृत्तसंस्था)