भारतीय महिला विजयी
By admin | Published: February 23, 2016 03:17 AM2016-02-23T03:17:11+5:302016-02-23T03:17:11+5:30
अनुजा पाटील (१४ धावांत ३ बळी) आणि दीप्ती शर्मा (२३ धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० लढतीत
रांची : अनुजा पाटील (१४ धावांत ३ बळी) आणि दीप्ती शर्मा (२३ धावांत २ बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने सोमवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० लढतीत श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद १३० धावांची मजल मारली. लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्याचा संघाचा डाव ७ बाद ९६ धावांत रोखल्या गेला.
श्रीलंकेच्या डावात यष्टिरक्षक दिलानी मंडोदराने संघर्षपूर्ण नाबाद ४१ धावांची खेळी केली. कर्णधार शशिकला श्रीवर्धनेने १८ व हंसिमा करुणारत्नेने १४ धावांचे योगदान दिले. या तीन महिला फलंदाजांचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या अन्य खेळाडूंना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही.
भारतातर्फे आरतीने चार षटकांत १४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले तर दीप्तीने २३ धावांत २ खेळाडूंना तंबूचा मार्ग दाखवला. एकता बिष्ट व पूनम यादव यांनी अनुक्रमे २१ व १७ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी एक बळी घेतला.
त्याआधी, भारताची सुरुवातीला २ बाद १५ अशी अवस्था होती. कर्णधार मिताली राज (३) व वेल्लास्वामी वनिता (१२) यांना मोठी खेळी करता आली नाही. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्मृती मंधानाने डाव सावरला. तिने हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. मंधानाने २७ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकारांच्या मदतीने ३५ धावा फटकावल्या तर हरमनप्रीतने ४१ चेंडूंमध्ये २ चौकारासह ३६ धावा केल्या. अनुजाने नाबाद २२ धावांची खेळी केली.
श्रीलंकेतर्फे सुगंंधिका कुमारीने २८ धावांत ३ बळी घेतले. एशानी लोकोसुरियागेने १९ धावांत २ तर इनोका राणावीराने १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)