भारतीय महिलांनी जिंकली मालिका
By admin | Published: February 18, 2016 06:29 AM2016-02-18T06:29:03+5:302016-02-18T06:29:03+5:30
मध्यमगती गोलंदाज दीप्ती शर्मा (२३ धावांत ४ बळी) हिच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राज (नाबाद ५३) हिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला
रांची : मध्यमगती गोलंदाज दीप्ती शर्मा (२३ धावांत ४ बळी) हिच्या भेदक गोलंदाजीनंतर कर्णधार मिताली राज (नाबाद ५३) हिच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेला बुधवारी दुसऱ्या वनडे सामन्यात ४१ चेंडू
बाकी ठेवताना ६ गडी राखून ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी निर्णायक आघाडी घेतली.
भारताने श्रीलंकन संघाला ५० षटकांत ९ बाद १७८ धावांवर रोखल्यानंतर ४३.१ षटकांत ४ बाद १७९ धावा करून एकतर्फी विजय मिळविला. भारताने मालिकेतील पहिला सामना १०७ धावांनी जिंकला होता. या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना १९ फेब्रुवारी रोजी रांची येथे खेळवला जाईल. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना (४६) आणि थिरुष कामिनी (२६) यांनी भारताला १३.२ षटकांत ६७ धावांची सुरुवात करून विजयाचा मजबूत पाया रचला.
कामिनीने ४४ चेंडूंत ५ चौकार मारले, तर स्मृती मानधना हिने ४६ चेंडूंत ४ चौकार व एक षटकार मारला. त्यानंतर कर्णधार मिताली राज हिने हरमनप्रीत कौर हिच्या साथीने ६४ धावांची भागीदारी करताना भारताचा विजय निश्चित केला. हरमनप्रीतने ६१ चेंडूंत ६ चौकारांसह ४१ धावा केल्या.
त्यानंतर मितालीने दीप्ती शर्माच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मितालीने ८० चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद ५३ धावा
केल्या. दीप्ती शर्मा ८ धावांवर नाबाद राहिली.
श्रीलंकेकडून फिरकी गोलंदाज सुगंधा कुमारी हिने ३९ धावांत ४ गडी बाद केले. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाने भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यासमोर नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्यांच्याकडून सलामीवीर प्रसादनी वीराकोड्डीने ३७ आणि दिलानी मनोदराने नाबाद ४३ धावा केल्या. भारताकडून दीप्तीने २३ धावांत ४ गडी बाद केले. राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव आणि हरमनप्रीत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद १७८. (प्रसादनी वीराकोड्डी ३७, दिलानी मनोदरा नाबाद ४३. दीप्ती शर्मा ४/२३).
भारत : ४३.१ षटकांत ४ बाद १७९. (मिताली राज ५३, स्मृती मानधना ४६, थिरुष कामिनी २६. सुगंधा कुमारी ४/३९).