भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव
By admin | Published: March 28, 2017 01:15 AM2017-03-28T01:15:00+5:302017-03-28T01:15:00+5:30
हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीआधी झालेल्या सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी साधल्यानंतर भारतीय
वेस्ट व्हँकुव्हर (कॅनडा) : हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीआधी झालेल्या सामन्यात चिलीविरुद्ध बरोबरी साधल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाला कॅनडाविरुद्ध मात्र १-३ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.
सामन्याच्या ८ व्याच मिनिटाला निक्की वूडक्रोफ्टने जबरदस्त मैदानी गोल करीत कॅनडाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर, स्टेफनी नारलँडरने १९ व्या मिनिटाला गोल करून कॅनडाची आघाडी २-० अशी केली. या शानदार कामगिरीच्या जोरावर कॅनडाने आपली आघाडी मध्यंतरापर्यंत कायम राखत सामन्यावर घट्ट पकड मिळवली.
मध्यंतरानंतर भारतीयांच्या पुनरागमनाची अपेक्षा होती. भारतीयांनी त्याप्रमाणे खेळ करीत आशाही उंचावल्या. गुरजित कौरने ३४ व्या मिनिटाला वेगवान आगेकूच करताना महत्त्वपूर्ण गोल करीत भारतीयांची पिछाडी १-२ अशी कमी केली. या वेळी, भारतीय संघ कॅनडाला चोख प्रत्युत्तर देणार, असे चित्र होते. परंतु, ४९ व्या मिनिटाला कार्ली जोहान्सनने संघाचा तिसरा गोल नोंदवताना कॅनडाला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. कॅनडाच्या या धडाक्यापुढे अखेरपर्यंत भारतीय महिला दडपणाखाली राहिल्या आणि कॅनडाने हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखत बाजी मारली. (वृत्तसंस्था)