IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 03:25 PM2022-08-07T15:25:10+5:302022-08-07T15:25:37+5:30

भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंडचा पराभव करून कांस्य पदक जिंकले आहे.

Indian women's hockey team won the bronze medal in shootout match against New Zealand | IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

IND vs NZ Hockey:भारतीय महिलांचा अभेद्य बचाव, हॉकीत जिंकले विक्रमी कांस्यपदक

googlenewsNext

बर्गिंहॅम : सध्या जगभर राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मुळे खेळमय वातावरण झाले आहे. भारतीय खेळाडूंनी शनिवारी विक्रमी कामगिरी करून एकाच दिवसात १४ पदकं जिंकली आहेत. आज स्पर्धेच्या दहाव्या दिवशी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कांस्य पदकासाठी लढत पार पडली. भारतीय महिला हॉकी संघाचा (Indian Hockey Team) उपांत्यफेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. भारतीय महिलांनी शूट आऊट सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पराभव करून विक्रमी कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. शूट-आऊट सामन्यात भारताची गोलरक्षक सविताने तीन गोल वाचवले आणि तब्बल १६ वर्षांनंतर भारताला राष्ट्रकुल स्पर्धेतील पदक मिळवून दिले. 

भारताला पेनल्टी पडली महागात
खरं तर सामन्यात सुरूवातीला भारतीय संघाचे एकतर्फी वर्चस्व राहिले होते. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. सामना सुरू झाल्याच्या ८ मिनिटांनंतर भारतीय खेळाडूंनी आक्रमक पवित्रा धारण करून चेंडू सतत फिरवत ठेवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सलीमा तेटे हिने गोल केल्याने भारताने १-० अशी आघाडी घेतली. दुसरा क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने सावध खेळी केली आणि पहिल्या हाफपर्यंत १-० अशी आघाडी कायम ठेवली. तिसरा क्लार्टर संपायला ६ मिनिटांहून कमी कालावधी असताना सलिमाला ग्रीन कार्ड दाखवण्यात आले. क्वार्टर तीनच्या अखेरपर्यंत भारताने न्यूझीलंडविरुद्ध १-० अशी आघाडी कायम ठेवली. मात्र क्वार्टर ४ मध्ये न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि त्याचाच फायदा घेत न्यूझीलंडने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. गोंधळलेल्या नवनीतने चेंडू पायाने मारला म्हणून ही पेनल्टी देण्यात आली होती. सामना बरोबरीत संपल्याने शूट-आऊट सामना खेळवावा लागला. 

ऑस्ट्रेलियाने शूट आऊट सामन्यामध्येच भारतीय संघाचा ३-० ने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. भारत आणि न्यूझीलंडचा संघ याआधी ३४ वेळा आमनेसामने आला होता, ज्यामधील २३ सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला होता तर भारताने १० सामने जिंकले होते आणि एक सामना अनिर्णित राहिला होता.  

राष्ट्रकुल स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड 
भारत ०-३ न्यूझीलंड, १९९८ कांस्यपदक सामना
भारत १-३ न्यूझीलंड, २००२ ग्रुप स्टेज
भारत २-१ न्यूझीलंड, २००२ उपांत्य फेरी
भारत १-० न्यूझीलंड, २००६ उपांत्य फेरी
भारत ०-३ न्यूझीलंड, २०१४ ग्रुप स्टेज

शूट आऊटमध्ये ऑस्ट्रेलियाने मिळवला होता विजय 
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामधील उपांत्येफेरीचा सामना १-१ च्या बरोबरीत समाप्त झाला होता. यानंतर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी शूट आऊट सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३-० ने मोठा विजय मिळवून फायनलचे तिकिट मिळवले. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या पराभवामध्ये पंचाचा देखील मोठा वाटा राहिला. शूट-आऊटमध्ये भारताने पहिला गोल वाचवला होता, पण नंतर वेळ सुरूच झाली नसल्याचे सांगण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक संधी देण्यात आली. यानंतर भारतीय संघ पिछाडीवर गेला. पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या वाघिणींना पराभव पत्करावा लागला होता. यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली होती. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती.

सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने स्पर्धेतील चारपैकी तीन सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. मात्र भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये वादग्रस्त पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ पिछाडीवर होता मात्र वंदना कटारियाने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली होती. मात्र त्यानंतर शूट-आऊट सामन्यात भारताच्या खात्यात कांस्य पदक आले आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
सविता पुनिया (कर्णधार), दिप ग्रेस एक्का, गुरजित कौर, उदिता, सुशिला चानू पुक्रंबम, ज्योती, सालिमा तेटे, शर्मिला देवी, नेहा, नवनीत कौर, वंदना कटारिया. 


 

Web Title: Indian women's hockey team won the bronze medal in shootout match against New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.