भारतीय महिलांचा दणदणीत विजय
By Admin | Published: November 11, 2016 12:59 AM2016-11-11T00:59:49+5:302016-11-11T00:59:49+5:30
डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (४/२१) आणि एकता बिस्त (३/१४) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने
विजयवाडा : डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (४/२१) आणि एकता बिस्त (३/१४) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
गोकराजू लिआला गंगाराजू एसीए क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात विंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, भारतीयांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. राजेश्वरी आणि एकता यांनी टिच्चून मारा करताना विंडीजच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. विंडीजचा डाव ४२.४ षटकांत केवळ १३१ धावांत संपुष्टात आला.
यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय महिलांची सुरुवातही अडखळती झाली. स्म्रिती मंधना (७), मोना मेशरम (२), दीप्ती शर्मा (१६) आणि हरमनप्रीत कौर (१) झटपट परतल्याने भारतीय संघाची एकवेळ १६.३ षटकांत ४ बाद ३६ धावा अशी बिकट अवस्था झाली होती. या वेळी विंडीजने जबरदस्त नियंत्रण मिळवले होते.
परंतु, कर्णधार मिताली राजने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर भारताची गाडी रुळावर आणली. दुसऱ्या टोकाकडून वेदा क्रिष्णमूर्तीनेही मितालीला चांगली साथ देताना निर्णायक नाबाद अर्धशतक झळकावले. वेदाने ७० चेंडंूत ४ चौकार व २ षटकार खेचताना नाबाद ५२ धावा काढल्या. तर, मितालीने ९१ चेंडंूत ६ चौकारांसह नाबाद ४६ धावांची खेळी केली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९७ भागीदारी करून विंडीजच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताने ३९.१ षटकांत ४ फलंदाज गमावून १३३ धावा काढल्या. तत्पूर्वी, राजेश्वरी आणि एकता यांनी ठराविक अंतराने दिलेल्या धक्क्यानंतर विंडीजची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. यष्टिरक्षक फलंदाज मेरिस्सा अग्युल्लेरिया हिने नाबाद राहताना सर्वाधिक ४२ धावा काढले. तर, सलामीवीर हायली मॅथ्यूसने २४ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
वेस्ट इंडीज : ४२.२ षटकांत
सर्व बाद १३१ धावा (मेरिस्सा अग्युल्लेरिया ४२, हायली मॅथ्यूसने २४; राजेश्वरी गायकवाड ४/२१, एकता बिस्त ३/१४) पराभूत वि. भारत : ३९.१ षटकांत ४ बाद १३३ धावा (वेदा क्रिष्णमूर्ती नाबाद ५२, मिताली राज नाबाद ४६; शकेरा सेलमन २/११)