भारतीय महिला संघ अंतिम फेरीत
By admin | Published: April 29, 2016 07:19 PM2016-04-29T19:19:08+5:302016-04-29T19:19:08+5:30
भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शुक्रवारी तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल मानांकित जर्मनीचा ५-३ ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. भारताला सुवर्णपदकासाठी
विश्वकप तिरंदाजी : उपांत्य फेरीत अव्वल मानांकित जर्मनीवर ५-३ ने मात
शंघाई : भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शुक्रवारी तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल मानांकित जर्मनीचा ५-३ ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. भारताला सुवर्णपदकासाठी अंतिम फेरीत चिनी ताइपेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
भारत रिकर्व्ह इव्हेंटमध्ये पुरुष गटात आणि मिश्र गटात पदकाच्या शर्यतीत कायम आहे, पण कम्पाऊंडमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक ठरली.
दीपिका कुमारी, लैशराम बोम्बाल्या देवी आणि लक्ष्मीराणी माझी यांनी वैयक्तिक गटातील निराशाजनक कामगिरीतून सावरताना जर्मनीच्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत सातव्या मानांकित चिनी ताइपेने त्यांच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या रशियन संघाचा ६-० ने पराभव केला. रिकर्व्ह गटातील सर्व अंतिम लढत रविवारी होणार आहे तर आज, शनिवारी कम्पाऊंड इव्हेंटची अंतिम फेरी होईल.
भारतीय खेळाडूंनी तीन नऊ गुणांची कमाई केली त्यानंतर तीन एक्सचा स्कोअर नोंदवत पहिल्या सेटमध्ये २-० अशी आघाडी घेतली.
जर्मनीच्या लिसा उनरू, एलेना रिच्टर व करिना विंटर यांचा समावेश असलेल्या संघाने दुसऱ्या सेटमध्ये शानदार कामगिरी करीत ५७ गुण मिळवले, पण भारतीय संघाने ३-१ ने अघाडी मिळवली होती. त्यानंतर भारतीय संघाने ५-३ ने विजयावर शिक्कामोर्तब केले.
चौथ्या मानांकित भारताने १३ व्या मानांकित अमेरिका संघाचा पराभव करीत चांगली सुरुवात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत भारताने चीनचा ५-४ ने पराभव केला.
अतुन दास, जयंत तालुकदार व मंगलसिंग चम्पिया या तिसऱ्या मानांकित रिकर्व्ह पुरुष संघाला उपांत्य फेरीत शूटआऊटमध्ये दुसऱ्या मानांकित नेदरलँडविरुद्ध ४-५ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिल्या फेरीत फ्रान्सचा ५-३ ने तर उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीचा ६-२ ने पराभव केला होता. आता भारतीय पुरुष संघाला कांस्यपदकासाठी प्लेआॅफमध्ये नवव्या मानांकित ब्रिटनविरुद्ध लढत द्यावी लागले.
भारतीय पुरुष कम्पाऊंड संघाला पहिल्या फेरीत मानांकनामध्ये खालच्या स्थानावर असलेल्या इराणविरुद्ध २२६-२३३ ने पराभव स्वीकारावा लागला. सहावे मानांकनप्राप्त भारतीय महिला कम्पाऊंड संघाने पहिल्या फेरीत मलेशियाचा २२४-२२३ ने पराभव केला, पण त्यानंतर तिसऱ्या मानांकित जर्मनीविरुद्ध २२०-२२९ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)