आंदोलक पैलवानांनी निम्मी कुस्ती जिंकली; ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध FIR दाखल होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 03:46 PM2023-04-28T15:46:25+5:302023-04-28T15:46:34+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात होत असलेल्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील दिग्गज पाठिंबा देत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झासह क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या मागणीला यश आले असून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी SC ला सांगितले की WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे
दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला एफआयआरबद्दल माहिती दिली. खरं तर सर्वोच्च न्यायालय ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे.
FIR दाखल होणार
यापूर्वी २५ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने सात महिला कुस्तीपटूंच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली होती. या महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मंगळवारी न्यायालयाने सांगितले होते की, कुस्तीपटूंनी याचिकेत लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत, या प्रकरणात सुनावणी आवश्यक आहे.
Sexual harassment: Delhi Police tells SC it has decided to lodge FIR on complaint of wrestlers against WFI chief Brij Bhushan Sharan Singh
— Press Trust of India (@PTI_News) April 28, 2023
आखाड्याबाहेरील कुस्तीचा सहावा दिवस
ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी (ब्रिजभूषण शरण सिंह) अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"