भारतीय युवा संघ आशिया ‘चॅम्पियन’
By admin | Published: December 24, 2016 01:19 AM2016-12-24T01:19:49+5:302016-12-24T01:19:49+5:30
फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव
कोलोंबो : फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने श्रीलंकेचा ३४ धावांनी पराभव करून १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्ट्रिक केली.
आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत ८ बाद २७३ धावांची समाधानकारक मजलम मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ यजमान श्रीलंकेचा संघ ३९.५ षटकात ४ बाद १९६ धावा अशा सुस्थितीत होता. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी मोक्याच्यावेळी अचूक मारा करताना लंकेच्या फलंदाजांना जखडवून ठेवत त्यांचा डाव ४८.४ षटकांत २३९ धावांमध्ये संपुष्टात आणला. लंकेने आपले अखेरचे ६ फलंदाज केवळ ४३ धावांत गमावले.
कर्णधार अभिषेक शर्माने ३७ धावांमध्ये ४ महत्त्वपूर्ण बळी घेत लंकेच्या फलंदाजीला खिंडार पाडले. राहुल चहरने त्याला उपयुक्त साथ देताना २२ धावांत ३ बळी घेतले. यश ठाकूरने एक बळी मिळविला. सलामीवीर रेवेन केली (६२) आणि कर्णधार कमिंदू मेंडिस (५३) यांचा अपवाद वगळता लंकेच्या एकाही फलंदाजाला चमक दाखविता आली नाही. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करून यजमानांच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र, अभिषेकने केलीला बाद करून ही जमलेली जोडी फोडली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारताने समाधानकारक मजल मारली. सलामीवीर हिमांशू राणा (७१) आणि शुभम गिल (७०) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. तर, याआधी मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉने (३९) राणासह भारताला ६७ धावांची दमदार सलामी दिली. याव्यतिरिक्त अभिषेक (२९), सलमान खान (२६) आणि कमलेश नागरकोटी (२३) यांनीही चांगली फलंदाजी केली. श्रीलंकेकडून निपुन रंसिका आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी ३ बळी घेत भारताला रोखण्याचा प्रयत्न केला.
सामन्यात निर्णायक अष्टपैलू खेळी करणारा भारताचा कर्णधार अभिषेक शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर स्पर्धेत जबरदस्त फटकेबाजी केलेल्या हिमांशू राणाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट एकदिवसीय युवा पदार्पण पुरस्कारासाठी राहुल चहर, कमलेश नागरकोटी आणि हेत पटेल या भारतीयांची निवड करण्यात आली.