भारतीय युवा फुटबॉल संघाचा पराभव
By admin | Published: May 2, 2017 01:21 AM2017-05-02T01:21:10+5:302017-05-02T01:21:10+5:30
भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाला एका सराव सामन्यात पोर्तुगालचा स्थानिक संघ एस्टोरिलविरुध्द १-४ असा पराभव
नवी दिल्ली : भारताच्या १७ वर्षांखालील फुटबॉल संघाला एका सराव सामन्यात पोर्तुगालचा स्थानिक संघ एस्टोरिलविरुध्द १-४ असा पराभव पत्करावा लागला.
लिस्बेन येथे झालेला हा सामना एकतर्फी झाला. आठव्या मिनिटाला मोंटेरोने गोल करुन एस्टोरिलने आघाडी घेत वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. वेलेजने ३३व्या मिनिटाला गोल करुन एस्टोरिलची आघाडी २-० अशी केली.
दडपणाखाली आलेल्या भारताकडून अनेक चुकाही झाल्या. भारतीय संघाच्या कमजोर बचावाचा फायदा घेत बर्नाडो याने ५५व्या गोल करुन एस्टोरिलची आघाडी ३-० अशी भक्कम केली. यानंतर, भारतीय खेळाडूंनी काहीसा चांगला बचाव करुन काहीवेळ पोर्तुगीज आक्रमण रोखले.
तसेच, ७८व्या मिनिटाला रहीम अलीने शानदार गोल करुन भारताची पिछाडी १-३ अशी कमी केली. परंतु, यानंतर आंद्रेड याने ८८व्या मिनिटाला गोल करुन एस्टोरिलच्या ४-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केला. (वृत्तसंस्था)