भारतीय युवांची विजयी आघाडी
By admin | Published: February 7, 2017 02:34 AM2017-02-07T02:34:29+5:302017-02-07T02:34:29+5:30
येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान भारताने इंग्लंडविरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले
मुंबई : येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान भारताने इंग्लंडविरुद्ध ३-१ अशी विजयी आघाडी घेऊन आपले वर्चस्व प्रस्थापित केले. चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय युवांनी पाहुण्या इंग्लंडचा २३० धावांनी फडशा पाडून मालिकेत विजयी आघाडी घेतली. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना सलग ३ सामने जिंकून आपला दबदबा राखला.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. मात्र, त्यांचा निर्णय शुभम गिल (१६०) आणि मुंबईकर पृथ्वी शॉ (१०५) यांनी चुकीचा ठरविला. या दोघांनी तडाखेबंद शतकी खेळी करताना इंग्लिश गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. या दोघांच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर निर्धारित ५० षटकांत ९ बाद ३८२ असा धावांचा हिमालय उभारला.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव अवघ्या १५२ धावांमध्ये गुंडाळून भारतीयांनी दणदणीत विजय नोंदवला. कमलेश नागरकोटी याने ३१ धावांत ४ बळी घेतले, तर विवेकानंद तिवारीने २० धावांत ३ बळी घेतले. तसेच, शिवम मावीने १८ धावांत २ बळी घेऊन इंग्लंडला सुरुवातीला हादरे दिले. गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. इंग्लंडकडून यष्टिरक्षक आॅली पोप याने ८५ चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तसेच, विल जॅकने ४९ चेंडंूत ३ चौकार व ३ षटकारांसह ४४ धावा काढल्या. या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीयांनी आपला हिसका दाखविला. मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या शुभमने पुन्हा आपला दणका देताना १२० चेंडूंत २३ चौकारांसह एक षटकार ठोकून १६० धावांची खेळी केली. तर, मालिकेत आतापर्यंत अपयशी ठरलेल्या पृथ्वीने आपला फॉर्म मिळवताना ८९ चेंडंूत १२ चौकार व २ षटकारांसह १०५ धावांची वेगवान खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी २३१ धावांची भागीदारी करून इंग्लंडची हवा काढली. परंतु, शुभम आणि पृथ्वी अनुक्रमे ४३व्या आणि ४४व्या षटकात बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. आर्थर गोडसाल, डेलरे रॉलिन्स
आणि हेन्री ब्रुक्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक :
भारत (१९ वर्षांखालील) : ५० षटकांत ९ बाद ३८२ धावा (शुभम गिल १६०, पृथ्वी शॉ १०५; हेन्री ब्रुक्स २/५८, आर्थर गोडसाल २/७८, डेलरे रॉलिन्स २/७८) वि.वि. इंग्लंड (१९ वर्षांखालील) : ३७.४ षटकांत सर्व बाद १५२ धावा. (आॅली पोप ५९, विल जॅक्स ४४; कमलेश नागरकोटी ४/३१, विवेकानंद तिवारी ३/२०).