‘आयर्नमॅन’वर भारतीय जवानाचा झेंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 08:20 PM2019-10-20T20:20:16+5:302019-10-20T20:20:40+5:30

बिश्वरजितने रचला इतिहास : भारतीयांचे स्पर्धेवर वर्चस्व

'Indianman' flag on 'Ironman'! | ‘आयर्नमॅन’वर भारतीय जवानाचा झेंडा!

‘आयर्नमॅन’वर भारतीय जवानाचा झेंडा!

Next

पणजी : देशात पहिल्यांदाच झालेल्या आयर्नमॅन ७०.३ या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेवर भारतीय सेनेच्या बिश्वरजित सिंग सईखोम याने झेंडा फडकवला. २९ वर्षीय या जवानाने ४ तास ४२ मिनिटांत ही स्पर्धा जिंकत इतिहास रचला. भारताच्या निहाल बेग आणि महेश लॉरेबाम यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकाविले. स्वित्झर्लंडच्या पाबलो इरातने चौथे स्थान मिळवले. स्पर्धेवर भारतीय ट्रायथलिट्सचे वर्चस्व राहिले.
मिरामार येथील बीचवर सकाळी ७ वाजल्यापासून स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेत १.९ किमी स्वीमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावण्याचे आव्हान होते. ट्रायथलिट्ना न थांबता हे तिन्ही प्रकार करायचे होते. त्यात पुणे येथील भारतीय सेनेच्या हवालदाराने बाजी मारली. त्याने प्रथमच आयर्नमॅन स्पर्धा जिंकली हे विशेष. बिश्वरजितने या तिन्ही प्रकारांसाठी ४ तास ४२ मिनिटांचा वेळ दिला. दुसºया क्रमांकावरील भारताचा निहाल बेग हा आयआयटी मुंबईचा असून त्याने ४ तास ४७ मिनिटे आणि ४७ सेकंदांत स्पर्धा पूर्ण केली. मणिपूरच्या महेशने ४ तास ५२ मिनिटांत शर्यत पूर्ण केली. 
या विजयानंतर पुणेस्थित हा जवान म्हणाला की, स्वित्झर्लंडच्या पाबलो इरातला पराभूत करण्याचे माझे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले. २०१५ मध्ये मी गोव्यातील ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली होती. अनेक वर्षांपासून पाबलो ही स्पर्धा जिंकत आहे. त्यामुळे त्याला पराभूत करण्याचे माझे ध्येय होते. फिनिश लाइनवर आलेला मी देशातील पहिला ठरलो, याचा मला खूप अभिमान आहे. 
बिश्वरजित हा व्यावसायिक ट्रायथलिट आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्वही केलेले आहे. रियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवडही झाली होती. मात्र, काही कारणास्तव या स्पर्धेत संघ सहभागी झाला नव्हता. याचे त्याला दु:खही आहे. परंतु, आयर्नमॅन स्पर्धा जिंकून त्याने आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. या शानदार कामगिरीनंतर बिश्वरजितला न्यूूझीलंड येथे पुढील वर्षी होणाºया आयर्नमॅन ७०.३ विश्वचॅम्पियनशिपसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री सकाळीच बीचवर
राज्यात पहिल्यांदाच झालेली आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धा पाहण्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही उत्सुकता होती. ते सकाळी ७.३० वाजताच मिरामार बीचवर पोहोचले. स्वीमिंग स्पर्धा आटोपल्यानंतर लगेच सायकलिंगला सुरुवात झाली. त्यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि सहभागींचा उत्साह वाढवला. या वेळी नौसेनेचे अ‍ॅडमिरल फिलिपोझ जी. पिनुमुतील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अशा प्रकारच्या क्रीडा प्रकारामुळे पर्यटनालाही मोठी मदत मिळते. तसेच क्रीडा संस्कृतीस चालना मिळते. अशा स्पर्धांचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यापुढेही ही स्पर्धा आयोजित करताना आम्हाला आनंद वाटेल. 
दरम्यान, या स्पर्र्धेत २७ देशांतील ट्रायथलिट्सनी भाग घेतला. देशात पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असल्याने अधिकाधिक खेळाडू देशातीलच होते. त्यात महाराष्ट्रातील जवळपास ६० खेळाडूंचा समावेश होता. 


सांघिक गटातही भारतीय त्रिकूट
सांघिक गटातही भारतीय त्रिकुटाने मजल मारली. यामध्ये अदित दहीया (स्वीमिंग), याशिष दहिया (सायकलिंग) आणि पंकज धिमन (धावणे) यांचा समावेश आहे. याशिष हा एका मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. त्याला ट्रायथलॉनबद्दल खूप आवड आहे. तो म्हणाला की, येथील वातावरण आणि स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद उत्तम होता. मी दुबई येथे गेल्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी झालो होतो. सहा महिन्यांपासून आम्ही गोव्यातील स्पर्धेसाठी तयारी करीत होतो. केलेल्या कष्टांचे फळ मिळाले.


पहाटेपासून पोलीस तैनात...
आयर्नमॅन या स्पर्धेसाठी सुरक्षारक्षक, पोलीस आणि स्वयंसेवक यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. गोवा पोलीस दलाला काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही पोलिसांची ड्युटी रात्री ३ वाजल्यापासून लावण्यात आली होती. पहाटे ४ वाजल्यापासून स्पर्धेचा मार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. दोनापावल सर्कलजवळ सकाळी ९ वाजता मात्र काही स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. मणिपाल हॉस्पिटलकडे जाण्याचा मार्ग बंद असल्याने काही डॉक्टरांची अडचण झाली. इतर ठिकाणी मात्र स्थानिकांनी स्पर्धेला प्रतिसाद दिला.

Web Title: 'Indianman' flag on 'Ironman'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत