भारतीयांमध्ये क्रीडाक्षेत्राची जाण कमीच - क्रीडामंत्री किरेन रिजिजू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 04:06 AM2020-07-12T04:06:29+5:302020-07-12T04:10:01+5:30
ज्योती कुमारीने कोरोनाकाळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून गुरुग्राम ते ते दरभंगा असा १२०० किमी प्रवास केला होता.
नवी दिल्ली : देशात बोटावर मोजण्याइतक्या नागरिकांना क्रीडाक्षेत्राबाबत पुरेशी माहिती असल्याने क्रीडासंस्कृती रुजविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी केले. संसदेतील माझ्या सहकाऱ्यांनादेखील खेळाचे मर्यादित ज्ञान असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्योतीकुमारी, कंबाला दौडविजेता श्रीनिवास गौडा आणि रामेश्वर गुजरसारख्यांनी सोशल मीडियावर अनेकांची शाबासकी मिळविल्यानंतर सहकारी खासदारांनी या लोकांना आॅलिम्पिक पदकाचे संभाव्य दावेदार संबोधल्याचे पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो, असे रिजिजू म्हणाले.
ज्योती कुमारीने कोरोनाकाळात आजारी वडिलांना सायकलवर बसवून गुरुग्राम ते ते दरभंगा असा १२०० किमी प्रवास केला होता. कर्नाटकचा श्रीनिवास गौडा याने ११ सेकंदात १०० मीटर शर्यत पूर्ण केल्याचा दावा केला होता.
कर्नाटकचा गौडा आणि मध्य प्रदेशचा गुर्जर यांनी शेतांमध्ये वेगवान दौड लावून अनेकांचे लक्ष वेधले होते. या दोघांची तुलना आॅलिम्पिक सुवर्ण विजेता उसेन बोल्टशी करण्यात आली. नंतर त्यांना चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. याविषयी रिजिजू म्हणाले, ‘श्रीनिवास वेगवान शर्यतीसाठी उपयुक्त नसल्याचा अहवाल साईने मला दिला होता. मात्र खेळाच्या ज्ञानाचा अभाव असल्याने लोकांनी श्रीनिवासची तुलना उसेन बोल्ट याच्याशी केली होती. क्रीडासंस्कृतीच्या अभावामुळे असे घडते.’