सर्वोत्तम कामगिरीचा भारतीयांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 05:41 AM2021-08-24T05:41:19+5:302021-08-24T05:41:36+5:30

पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावलेला स्टार भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंचउडी खेळाडू मरियप्पन थांगवेलू भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमूचे नेतृत्त्व करतील.

Indians determined to perform best | सर्वोत्तम कामगिरीचा भारतीयांचा निर्धार

सर्वोत्तम कामगिरीचा भारतीयांचा निर्धार

Next

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीनंतर भारतीयांना आता वेध लागले आहेत ते पॅरालिम्पिकचे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे ५४ खेळाडू सहभागी होणार असून, यावेळी पहिल्यांदाच भारतीय संघ दहापेक्षा अधिक पदके जिंकण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. 

पॅरालिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्ण पदक पटकावलेला स्टार भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया आणि उंचउडी खेळाडू मरियप्पन थांगवेलू भारताच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चमूचे नेतृत्त्व करतील. भारतीय संघाकडून यंदा पाच सुवर्ण पदकांसह किमान १५ पदकांची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. १९७२ सालापासून भारताने पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत एकूण १२ पदकांची कमाई केली आहे. यंदा भारतीय खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली, तर गुणतालिकेत अव्वल २५ देशांमध्ये भारताचा समावेश नक्कीच होईल. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशा एकूण चार पदकांसह ४३व्या स्थानी राहिला होता. 

गतविजेता भालाफेकपटू देवेंद्र झांझरिया (एफ ४६), विश्वविजेता भालाफेकपटू संदीप चौधरी (एफ ६४), उंचउडीतील गतविजेता मरियप्पन थांगवेलू यांच्याकडून भारताला सुवर्ण पदकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे भालाफेकीमध्ये माजी विश्वविजेता सुंदर सिंग गुर्जर  आणि अजित सिंग (दोघेही एफ ४६), नवदीप सिंग (एफ ४१) यांच्याकडूनही पदकांची आशा आहे. 

बॅडमिंटनचा पॅरालिम्पिक  स्पर्धेत प्रवेश होत असून, यामध्ये भारताला पदकाची मोठी संधी आहे. जागतिक क्रमवारीतील अव्वल प्रमोद भगत पुरुषांच्या एसएल ३ गटात सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. तसेच, कृष्णा नागर (एसएच ६), तरुण ढिल्लो (एसएल ४), पारुल परमार (एसएल ३) व पलक कोहली (एसयू ५) यांच्याकडूनही चमकदार खेळाची अपेक्षा आहे. याशिवाय, ॲथलेटिक्स, कॅनोईंग, जलतरण, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, टेबल टेनिस व तायक्वांडो यामध्येही भारताचा सहभाग आहे.

‘पॅरालिम्पियन हे खरे हिरो आहेत’
‘पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू हे खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळविण्यास गेलेल्या खेळाडूंना पाठिंबा देऊन सर्वांनी त्यांचा उत्साह वाढवावा,’ असे सांगत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने भारतीयांना पॅरा खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. 

सचिनने मंगळवारी सांगितले की, ‘आता पॅरालिम्पिक खेळांची वेळ आहे आणि सर्व भारतीयांना मी आवाहन करतो की, सर्वांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारताच्या सर्व ५४ खेळाडूंना समर्थन द्यावे. माझ्या मते, हे महिला आणि पुरुष खेळाडू विशेष क्षमतेचे नसून असाधारण क्षमतेचे खेळाडू आहेत. हे सर्व खऱ्या आयुष्यातील हिरो आहेत. या खेळाडूंच्या आतापर्यंतच्या प्रवासातून आपल्याला शिकायला मिळते. हे सर्वजण आपल्याला कायम प्रेरित करीत असतात. निकाल काहीही लागो; पण पॅरालिम्पिक खेळाडूंना पाठिंबा देणे गरजेचे आहे.’

Web Title: Indians determined to perform best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.