रिओ क्रीडाग्राममध्ये होतेय भारतीयांची एन्ट्री
By admin | Published: July 29, 2016 03:15 AM2016-07-29T03:15:40+5:302016-07-29T03:15:40+5:30
आॅलिम्पिकला काही दिवस शिल्लक राहिले असताना आता भारतीय संघातील खेळाडूंचा छोट्या छोट्या समूहाने रिओमध्ये प्रवेश होऊ लागला आहे. बहुतेक खेळाडू छोट्या छोट्या समूहाने
रिओ : आॅलिम्पिकला काही दिवस शिल्लक राहिले असताना आता भारतीय संघातील खेळाडूंचा छोट्या छोट्या समूहाने रिओमध्ये प्रवेश होऊ लागला आहे. बहुतेक खेळाडू छोट्या छोट्या समूहाने क्रीडानगरीत पोहोचले असून, इतर खेळाडूही पुढील काही दिवसांत रिओमध्ये दाखल होतील.
सकाळी न्याहरीच्यावेळी सभागृहामध्ये भारतीय संघाचे राकेश गुप्ता यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष बाक यांची भेट घेतली. बाक हे यावेळी आॅलिम्पिक व्हिलेजला भेट देण्यासाठी आले होते. गुप्ता यांच्याशी संवाद साधताना बाक यांनी भारतीय खेळाडूंच्या तयारीविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी बाक यांनी, ‘‘भारतीय संघाची तयारी कशी सुरू आहे? यावेळी मला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू पहिले पोहचले हे पाहून आनंद वाटला. आॅलिम्पिकसाठी भारतीयांना मी शुभेच्छा देतो,’’ असे सांगितेले.
आॅलिम्पिक व्हिलेज बाबतीत गुप्ता यांनी सांगितले की, ‘‘येथे खूप प्रमाणात शाकाहारी खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत आणखी खेळाडू येथे सहभागी होणार असून यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. येथे राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुम्स चांगल्या असून अंतिम काम अजूनही सुरू आहे. पुढील दोन दिवसांत आॅलिम्पिक व्हिलेज पूर्णपणे सज्ज असेल. भारतीय संघ यजमान ब्राझील संघाशेजारीच असून, येथे उजव्या बाजूला अप्रतिम जलतरण तलाव आहे. आॅलिम्पिक प्लाझा व जिमदेखील जवळच असून, येथील वातावरणाशी खेळाडू जुळवून घेत आहेत.’’ (वृत्तसंस्था)
हे खेळाडू पोहोचले रिओला... जीतू राय, प्रकाश नानजप्पा, गुरप्रीत सिंग, कायनन चेनाई, मानवजित संधू, अपूर्वी चंदेला आणि आयोनिका पॉल (सर्व निशानेबाज), खुशबीर कौर, सपना पुनिया, संदीप कुमार आणि मनीष राव (चालण्याची शर्यत), मनप्रीत कौर (गोळाफेक), शिव थापा आणि मनोज कुमार (बॉक्सर).