International Hockey Awards: आंतरराष्ट्रीय हॉकी पुरस्कारांमध्ये भारतीयांनी राखला एकहाती दबदबा; बेल्जियमचा विराेध

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:21 AM2021-10-07T05:21:14+5:302021-10-07T05:21:37+5:30

International Hockey Awards: बेल्जियमने घेतला आक्षेप ; हरमनप्रीत सिंग, गुरजित कौर ठरले सर्वोत्तम खेळाडू

Indians hold one-sided dominance in international hockey awards; Belgian opposition | International Hockey Awards: आंतरराष्ट्रीय हॉकी पुरस्कारांमध्ये भारतीयांनी राखला एकहाती दबदबा; बेल्जियमचा विराेध

International Hockey Awards: आंतरराष्ट्रीय हॉकी पुरस्कारांमध्ये भारतीयांनी राखला एकहाती दबदबा; बेल्जियमचा विराेध

Next

लुसाने : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) च्या वार्षिक पुरस्कारांवर भारतीय खेळाडूंनी कब्जा करताना आपला दबदबा राखला. मतदानाच्या आधारे विजेत्यांची घोषणा करण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये सर्व आघाडीचे पुरस्कार भारतीयांनी पटकावले. यामुळे पुरुष ऑलिम्पिक चॅम्पियन बेल्जियमने या पद्धतीवर आक्षेप घेत विरोध दर्शवला. 

भारताच्या पाच खेळाडूंनी आणि पुरुष-महिला संघाच्या प्रशिक्षकांनी विविध गटांत सर्वाधिक मते मिळवताना आघाडीच्या पुरस्कारांवर कब्जा केला. भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पटकावले होते, तर महिला संघाने चौथ्या स्थानी झेप घेतली होती. 

हरमनप्रीत सिंग वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू, तर गुरजित कौर वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू ठरली. दोघांनी ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सर्वाधिक गोल केले होते. याशिवाय सविता पुनिया (सर्वोत्तम महिला गोलरक्षक), पी. आर. श्रीजेश (सर्वोत्तम पुरुष गोलरक्षक), शर्मिला देवी (सर्वोत्तम महिला उदयोन्मुख खेळाडू) आणि विवेक प्रसाद (सर्वोत्तम पुरुष उदयोन्मुख खेळाडू) यांनीही आपापल्या गटात वर्चस्व राखले. त्याचप्रमाणे प्रशिक्षकांमध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक सोर्ड मरिन आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनीही सर्वाधिक मतांच्या आधारे सर्वोत्तम प्रशिक्षक पुरस्कार मिळवला. 

बेल्जियमचा विराेध
पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर हॉकी बेल्जियमने पुरस्कार प्रक्रियावर टीका केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवलेल्या बेल्जियमच्या एकाही खेळाडूला या वेळी पुरस्कार जाहीर झाला नाही. हॉकी बेल्जियमने ट्वीट केले की, ‘एफआयएच हॉकी स्टार पुरस्काराने हॉकी बेल्जियम अत्यंत निराश आहे. सर्व गटांत अनेक नामांकन असलेल्या सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडूंना एकही पुरस्कार मिळाला नाही. यामुळे पुरस्कार प्रणाली अयोग्य असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात निष्पक्ष प्रणालीसाठी आम्ही एफआयएचसोबत काम करु.’ यानंतर बेल्जियम संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडलद्वारेही या ट्वीटचे समर्थन करत एफआयच पुरस्कार प्रणालीचा निषेध करण्यात आला.

७९ राष्ट्रीय संघटनांनी केले मतदान
एफआयएचने दिलेल्या माहितीनुसार एकूण ७९ राष्ट्रीय संघटनांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये आफ्रिकेतील २५ सदस्यांपैकी ११, आशियातील ३३ सदस्यांपैकी २९, युरोपच्या ४२ सदस्यांपैकी १९, ओसोनियाच्या ८ पैकी ३ आणि पॅन अमेरिकेतील ३० सदस्यांपैकी १७ अशा एकूण ७९ सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला. या पुरस्कारांसाठी विक्रमी ३ लाख पाठीराख्यांनी मतदान केल्याचेही एफआयएचने म्हटले.

Web Title: Indians hold one-sided dominance in international hockey awards; Belgian opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी