‘भारतप्रेम’ आले आफ्रिदीच्या अंगाशी
By admin | Published: March 15, 2016 04:38 AM2016-03-15T04:38:29+5:302016-03-15T09:15:14+5:30
पाकपेक्षा भारतात अधिक प्रेम मिळते, असे वक्तव्य करणारा शाहिद आफ्रिदीवर लाहोर न्यायालयाने थेट देशद्रोहाचा आरोप ठेवून नोटीस बजावली आहे.
लाहोर : पाकपेक्षा भारतात अधिक पे्रम मिळते, अशा शब्दांत भारताबद्दलच्या भावना व्यक्त करणे पाकिस्तानचा कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या चांगलेच अंगाशी आले असून, त्याला लाहोर न्यायालयाने थेट देशद्रोहाचा आरोप ठेवून कायदेशीर नोटीस बजावली आहे.
टी२० विश्वचषकासाठी भारतात आल्यानंतर आफ्रिदीने कोलकात्यात पत्रकार परिषद घेतली होती. ‘भारतीयांकडून जितके प्रेम मिळाले, तितके प्रेम पाकिस्तानमध्येही मिळाले नाही,’ अशा भावना व्यक्त करून त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मात्र आता हेच ‘भारतप्रेम’ आफ्रिदीवर बूमरँगसारखे उलटले आहे.
आफ्रिदीच्या या वक्तव्यानंतर अजहर सादिक या वरिष्ठ वकिलाने लाहोर न्यायालयात त्याच्याविरुद्ध याचिका केली. यानुसार लाहोर न्यायालयाने १५ दिवसांच्या आत याबाबत उत्तर देण्याचे आदेश दिल्याने आफ्रिदी अडचणीत आला आहे. याबाबतीत सादिक यांनी वृत्तसंस्थेला माहिती दिली की, ‘आफ्रिदीने पाकिस्तानच्या तुलनेत भारतात अधिक प्रेम मिळाल्याचे विधान करून पूर्ण पाकिस्तानला निराश केले आहे. आफ्रिदीने देशद्रोह केला आहे. त्यामुळे टी२० विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध पाकिस्तान संघ विजयासाठी पूर्ण प्रयत्न करेल याबाबत कोण शाश्वती देईल.’
मियाँदाद भडकला!
अशी मुक्ताफळे उधळताना या खेळाडूंना लाज वाटली पाहिजे. तुम्ही तेथे यजमान देशाचे कौतुक करण्यासाठी गेले नाहीत हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतीयांनी आतापर्यंत आम्हाला काय दिले? गेल्या पाच वर्षांत त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटसाठी काय केले? आमचे खेळाडू असे का बोलत आहेत, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी चांगले क्रिकेट खेळावे, अनावश्यक गोष्टी टाळाव्यात.
- जावेद मियाँदाद,
माजी क्रिकेटपटू, पाक